हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी” म्हणत ठाकरे गटावर शरसंधान
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे आपला वर्धापन दिन साजरा करणार आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाने आपल्या राजकीय दिशा व भूमिकेचा संकेत देणारे एक व्यंगचित्र समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध केले असून, “हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी” हा मजकूर आणि शिवसेनेचा वाघ तसेच भगवा ध्वज घेऊन चालणारे शिंदे यांच्या प्रतिमेसह हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्यंगचित्रातून शिंदे गटाने अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर टीका करत हिंदुत्वाशी असलेल्या निष्ठेचा पुनरुच्चार केला आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील जनतेने आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याचे शिंदे वारंवार आपल्या भाषणांमध्ये सांगत आले आहेत. हेच प्रतिबिंब या व्यंगचित्रातूनही उमटते.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी पक्षाच्या आगामी रणनीतीची आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची घोषणाही होण्याची शक्यता आहे.
व्यंगचित्रात शिवसेनेचा पारंपरिक वाघ, भगवा ध्वज आणि महाराष्ट्राचा भौगोलिक आकार दाखवत, पक्षाच्या मुळ हिंदुत्ववादी अधिष्ठानावर ठामपणे उभा असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे गटावर वेळोवेळी ‘हिंदुत्व सोडल्याचा’ आरोप करणाऱ्या शिंदे गटाने याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा वैचारिक संघर्ष उभा केला आहे.
या व्यंगचित्राच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गटाने निवडणूकपूर्व वातावरण तयार करत राजकीय विरोधकांवर टीका करण्याचा प्रयत्न केल्याचे जाणकारांचे मत आहे. तर दुसरीकडे, ही टीका म्हणजे शिवसेनेच्या मूळ विचारधारेचा वारस असल्याचा दावा अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचेही म्हटले जात आहे.