महाड: महाड-दापोली राज्य मार्गावर मांडवकर-कोंड गावाजवळ पुणे फौजी अंबवडे (अहिरे कोंड) एसटी बसला अपघात होऊन बस रस्त्यावरून घसरली. या अपघातात चालक व महिला वाहकासह एकूण आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात आज दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडला. बस क्रमांक MH-07-C-9043 ही पिंपरी-चिंचवड आगाराची असून, ती पुणे फौजी अंबवडे मार्गावर कार्यरत होती. अपघाताच्या वेळी पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता, याच कारणामुळे बस रस्त्यावरून घसरली.
बसचे चालक अविनाश पांडुरंग लोखंडे (३४, रा. पिंपरी-चिंचवड) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर महिला वाहक पौर्णिमा प्रमोद होनकडसे (४६, रा. पुणे) यांना हात व कमरेला गंभीर इजा झाली आहे. शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी त्यांच्या खासगी वाहनातून चालक-वाहकांना रुग्णालयात दाखल केले. तर अन्य काही जखमी प्रवाशांना ‘महाशक्ती अॅम्बुलन्स’चे अनिल चव्हाण यांनी रुग्णालयात पोहोचवले.

जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे:
१. अविनाश पांडुरंग लोखंडे (३४), पिंपरी-चिंचवड – चालक
२. पौर्णिमा प्रमोद होनकडसे (४६), पुणे – महिला वाहक
३. आशाबाई नारायण जाधव (७५), फौजी अंबवडे
४. शारदा गजानन शेलार (६७), फौजी अंबवडे
५. सोहम ज्ञानेश्वर पवार (१७), फौजी अंबवडे
६. सिमाब सिकंदर पेडेकर (१६), शिरवली
७. सलवा अब्दुल सलाम पेडेकर (१७), शिरवली
८. आराधना दिगंबर पवार (१८), फौजी अंबवडे
९. लहू सखाराम पाते (५५), पांगरी
१०. विश्वजीत सोपान कदम (२७), शिरवली
सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एसटी महामंडळाने किरकोळ जखमींना तातडीने आर्थिक मदत दिली आहे.
दरम्यान, महाड-दापोली राज्य मार्गावरील अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. मे महिन्यापासून सुरू असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर एफएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याचा आरोप होत आहे. या कंपनीविरोधात अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही, ही बाब स्थानिक नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे.
गणेशोत्सव काळात या मार्गावरील वाहतूक वाढणार असताना अपघातांची ही मालिका चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.