मुंबई – राज्यातील ८३ हजार कर्मचाऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचे कधीही खाजगीकरण होणार नाही आणि सरकार ते होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.
मुंबई परळ बसस्थानकात राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या पुढाकाराने बसस्थानकातील कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशीतक (वॉटर प्यूरीफायर व कूलर) लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कामगार नेते भाई जगताप, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी ही राज्य शासनाची अंगीकृत सार्वजनिक संस्था आहे. तिचे खाजगीकरण होणार नाही. कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.”
एसटी कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करताना सरनाईक म्हणाले, “एसटी कर्मचारी अत्यंत मेहनती आहेत. त्यांना स्वच्छ आणि सुविधा संपन्न वातावरण देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. लवकरच चालक-वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह स्वच्छ ठेवण्यासाठी खाजगी स्वच्छता संस्था नेमली जाणार आहे. या संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांचे गणवेश धुऊन, इस्त्री करून देण्याची तसेच दाढी आणि केस कापण्याची सुविधा पुरवली जाणार आहे.”
“कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष दिल्यास त्यांच्या मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. त्यामुळे कामात एकाग्रता वाढून उत्पादकतेतही वाढ होईल,” असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.