मुंबई – अमली पदार्थ तस्करी आणि बाल गुन्हेगारीवर कठोर पावले उचलण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. अमली पदार्थ तस्करी प्रकरणांमध्ये ‘मकोका’ कायद्याचा प्रभावी वापर केला जाईल, तसेच बाल गुन्हेगार संदर्भातील कायदेशीर वयोमर्यादा १६ वरून १४ वर्षांवर आणण्याचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सदस्य विलास भुमरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मुलामुलींना नशेच्या विळख्यात ओढण्याचा प्रकार, ड्रग्ज विक्रेत्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. छत्रपती संभाजीनगर ‘ड्रग्ज हब’ बनले असून, संबंधित आरोपींवर मकोकांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी भुमरे यांनी मागणी केली. त्यांनी एका पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीचा उल्लेख करत, वाळूज पोलीस ठाण्यात अटक झालेल्या आरोपीला ‘नॉनव्हेज पार्टी’ दिल्याचेही निदर्शनास आणले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात कबुली दिली की, अज्ञान बालकांना ड्रग्ज तस्करीसाठी हाताशी धरले जाते. बाल गुन्हेगारांच्या वयोमर्यादेत बदल करता येईल का याचा विचार सुरू आहे. काही ठिकाणी बालकांच्या वतीने गुन्हे केले जात असल्याने, गुन्ह्याचे स्वरूप पाहून आवश्यक बदल केले जातील, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील बेहरामपाडा परिसरात ड्रग्ज व्यवसाय सुरू असल्यास तिथे धडक कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नायजेरियन नागरिकांकडून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, अशा नागरिकांना अटक करून डी-पोर्ट केले जाते; पण ते परत येऊन पुन्हा गुन्हे करतात. यावर केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. जिथे वारंवार अमली पदार्थांचे गुन्हे घडतात, तिथे मकोकासारखी कठोर कारवाई करण्याचा विचार सुरू आहे.
गेल्या आठवड्यातच सभागृहाने एनडीपीएस कायद्यात सुधारणा करण्यासाठी मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमधील सर्व पोलीस ठाण्यांत ‘अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड’ स्थापन करण्यात आले आहे. शाळा संपर्क अभियानांतर्गत शाळांमध्ये जनजागृती केली जात आहे. सरकारने कठोर कारवाई सुरू केल्यामुळे एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली असून, छत्रपती संभाजीनगरवर विशेष लक्ष दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.