मुंबई – राज्यातील तसेच मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर सरकारकडून मोठी कारवाई होणार असून, शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही, असा सक्त इशारा उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिला.
आमदार पराग अळवणी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येणार आहेत. तसेच, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.”
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत सध्या अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगिती असल्यामुळे ती कारवाई तात्पुरती थांबलेली आहे. मात्र आदेश मिळताच तीही बांधकामे हटवली जातील, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
“सध्या पावसाळा सुरू असल्याने काही ठिकाणी कारवाई करणे शक्य नाही. मात्र पावसाळ्यानंतर त्या बांधकामांवरही कारवाई केली जाईल,” असेही शिंदे म्हणाले. विलेपार्ले (पूर्व) येथील महानगरपालिकेच्या भूखंड क्र. २५६ वर बांधण्यात आलेल्या अनधिकृत शेडवर २४ मार्च २०२५ रोजी तोडक कारवाई झाली होती. नंतर त्या जागेवर अनधिकृत पार्किंगचे अतिक्रमण झाले होते, तेही ३ जून २०२५ रोजी हटवण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनीही सांगितले की, अनधिकृत बांधकामांवर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. सदस्यांनी त्यांच्या भागातील अनधिकृत बांधकामांची माहिती दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.