By योगेश त्रिवेदी
मुंबई – विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची गंभीर दखल शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली असून, त्यांनी युवासेनेच्या सिनेट सदस्यांना तातडीने मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार युवासेना उपनेत्या सौ. शितल शेठ देवरुखकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अजय भामरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी सध्याच्या सामाजिक वास्तवावर चिंता व्यक्त केली. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, अंमली पदार्थांचे वाढते सेवन, तसेच ताणतणावपूर्ण जीवनशैली यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव वाढत आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशक नेमणे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन व प्रबोधन करणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
याशिवाय, विद्यार्थ्यांचा वावर असलेल्या सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करता येईल, अशीही आग्रही मागणी युवासेनेने निवेदनाद्वारे केली.