सातारा – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला असला, तरी हा दावा फोल असून दिशाभूल करणारा आहे, असा स्पष्ट खुलासा स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केला आहे.
पवार म्हणाले की, सामंत यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी केवळ गजानन बंगाळे आणि रविंद्र इंगळे हे दोन पदाधिकारी सोडले, तर उर्वरितांनी सहा-सात वर्षांपूर्वीच संघटनेला रामराम ठोकला होता. यातील अनेकजण सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा स्वराज्य पक्षात कार्यरत असून त्यांचा सध्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी कोणताही संबंध नाही.
“स्वाभिमानी संघटना सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोमाने लढा देत आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच मंत्री सामंत अशा बिनबुडाच्या पोस्ट करत आहेत,” असा आरोपही अनिल पवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “उदय सामंत यांनी खरेच कोणाशी बैठक घेतली याची स्थानिक पातळीवर चौकशी केली, तर सत्य बाहेर येईल. प्रा. जालंदर पाटील हे पूर्वी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते, पण आता त्यांनाच कोण पदाधिकारी आहेत हे माहित नाही, यावरून त्यांचे कर्तृत्व स्पष्ट होते.”
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत, सरकारकडून होत असलेल्या दिशाभूल प्रयत्नांचा निषेध नोंदवला आहे