महाड — महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) पार पडलेल्या महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रिये दरम्यान शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष सुशांत झांबरे यांना ५०–६० जणांच्या जमावाने घेरल्याची गंभीर घटना घडली.
ही घटना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी दिली.
घटनेविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही विशिष्ट गटांनी झांबरे यांना अडवून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नव्हे, त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.
या दरम्यान, त्यांच्या अंगरक्षकाच्या (बॉडीगार्डच्या) रिव्हॉल्वर हिसकावण्याचाही प्रयत्न झाल्याचे जगताप यांनी माध्यमांना सांगितले.
स्नेहल जगताप म्हणाल्या, “निवडणुकीच्या दिवशी नागरिकांमध्ये भय आणि संभ्रम निर्माण व्हावा, यासाठी हे सर्व घडवले जात आहे. स्वतःच प्रकार घडवून नंतर ‘माझ्यावर अन्याय झाला’ असा आव आणण्याचा हा सपशेल प्रयत्न आहे. अशा कृत्यांना महत्त्व देणे योग्य नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “निवडणुकीत पराभव निश्चित असल्याची जाणीव विरोधकांना झाली आहे. त्यामुळेच ते असे निंदनीय आणि भ्याड प्रकार करत आहेत.”
जगताप यांनी महाडकरांना आवाहन केले, “कोणत्याही अफवांना बळी न पडता, शांततेत मतदान करा. लोकशाहीचा अधिकार भीतीशिवाय बजावणे अत्यावश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “महाड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. मी, खा. सुनील तटकरे आणि ना. प्रवीण दरेकर महाडच्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जगताप यांनी केली.

