मुंबई – मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या अन्यायाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत मंगळवारी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते व माजी मंत्री सचिन अहिर यांनी महायुती सरकारवर आणि पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवर जोरदार टीका केली.
“हे सरकार महायुतीचे आहे की ब्रिटीश राजवटीचे?” असा सवाल करत अहिर म्हणाले, “एकीकडे मोर्चास परवानगी द्यायची, आणि दुसरीकडे ती परत घेत मोर्चाचे आयोजन करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधव आणि माजी आमदार राजू पाटील यांना रात्री ३ वाजता ताब्यात घ्यायचे – ही भूमिका संतापजनक असून मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा कृत्रिम संघर्ष निर्माण करण्याचा हा डाव आहे.”
अहिर यांनी थेट आरोप करत सांगितले की, “मीरा भाईंदरमध्ये मराठी जनतेचा उद्रेक वाढत असताना सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक स्वतः तिथे पोहोचले आणि पोलिसांनाच धमकावले. अशा घटनांवर सरकारची भूमिका काय आहे?”
“सरकारकडून विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेले विधानही परिस्थिती चिघळवणारे आहे,” असा गंभीर आरोप करत अहिर यांनी सरकारवर जातीयवाद भडकावण्याचा ठपका ठेवला.
पोलिसांची भूमिकाही पक्षपाती असल्याचे सांगत त्यांनी म्हटले, “स्थानिक भाजप आमदारांच्या दबावाखाली पोलिसांनी आंदोलकांना लग्नाच्या हॉलमध्ये डांबून ठेवले. हा मोर्चा केवळ जिल्हा पातळीवरचा असून तो अडवण्याची गरज नव्हती.”
“तुमचेच मंत्री रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. या गळचेपीचे गांभीर्य आता राज ठाकरेही सांगू शकतात, कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं,” असे म्हणत सचिन अहिर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत परखड शब्दांत नाराजी व्यक्त केली.