खा.सुनिल तटकरे यांचे स्पष्टीकरण
काही अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे.त्यामुळे जे-जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत.आणि एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न नक्कीच केला जाईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
आमच्यामध्ये फारशी जागांची संख्या नसून ९० ते ९५ टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार म्हणून उत्तम पध्दतीने काम सुरू झाले आहे.त्यामुळे आजच महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे २८८ जागांवर महायुती पूर्ण ताकदीने,आणि संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत.अन्य ठिकाणी अपक्ष उमेदवार हे भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील तर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत असून एक – दोन दिवसात नाराजांची समजूत काढण्यात नक्कीच यशस्वी होऊ,असा विश्वासही खा. तटकरे यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्या कुठल्याच वक्तव्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतानाच बारामतीची जनता सूज्ञ आहे.३० वर्षात अजितदादांनी बारामतीत उभे केलेले प्रचंड काम बारामतीकर नव्हे तर पूणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र विसरू शकत नाही किंवा अनुभवत असून देशभर बारामती पॅटर्नचे कौतुक होत असते.त्यामधील अजितदादांचा जो सहभाग आहे तो सुज्ञ बारामतीकर ठरवतील की, कुणाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देऊ.मात्र या विधानसभेत प्रचंड फरकाने अजित पवार हेच निवडून येतील असा ठाम दावाही खा.तटकरे यांनी केला.
राज ठाकरे कधी-कधी त्यांच्या पध्दतीने बोलत असतात.कधी ते विनोद करतात तर कधी मिमिक्री करतात त्यामुळे त्यांचे बोलणे त्याच अर्थाने घ्यावे. त्यापेक्षा काही वेगळे असेल असे मला वाटत नाही असे सांगत,कॉंग्रेसला लोकसभेला मिळालेले यश कुठल्या पध्दतीने डोक्यात गेलेले आहे आणि ते किती जमिनीवर यायला लागले आहे याचे चित्र म्हणजे कोल्हापूरमध्ये काल कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज माघारी घेतला असा खोचक टोलाही खा.तटकरे यांनी लगावला.