ताज्या बातम्या महाराष्ट्र

खासदारांकडून माफीनामा घ्या! हेमंत पाटीलांवर प्रकरण शेकणार 

अधिष्ठात्यांना शौचालय साफ करण्यास लावल्याने डॉक्टर संघटनांचा संताप

Twitter : @therajkaran

मुंबई :

नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे (Dean Dr Shyamrao Wakode) यांना एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना खा. हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी शौचालय साफ करण्यास भाग पाडले. या घटनेचे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत असून खा. हेमंत पाटील यांनी जाहिर माफी मागावी, अशी मागणी होत आहे. तसे न झाल्यास राज्यभरातील डॉक्टरांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवा ढेपाळल्यास त्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहिल, असा इशाराच डॉक्टर संघटनांकडून देण्यात आला आहे. तुर्तास खा. हेमंत पाटील यांच्यावर ही घटना शेकणार असेच दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना म्हणजेच मध्यवर्ती मार्ड (MARD warns to hold protests against Shiv Sena MP) संघटनेने हे कृत्य निंदनीय असल्याचे सांगून निषेध केला आहे. अधिष्ठात्यांशी खा. हेमंत पाटील यांनी गैरवर्तणूक केली असून हे कृत्य घृणास्पद असल्याचे मध्यवर्ती मार्डने म्हटले आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षक, मनुष्यबळ, वर्ग-३ व ४ कर्मचारी, जीवनावश्यक औषधी तसेच वैद्यकीय संसाधन यांचा तुटवडा असताना त्या स्थितीतही निवासी डॉक्टर, वैद्यकीय शिक्षक (resident doctors, medical teachers) काम करत असतात व रुग्णसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि शासकीय दवाखांन्यांमध्ये जीवनावश्यक औषधांची आणि मनुष्यबळाची तीव्र टंचाईचे खापर डॉक्टरांच्या डोक्यावर न फोडता ही टंचाई दूर करत रुग्णसेवेला हातभार लावावा असे म्हटले आहे. घडलेल्या प्रकारामुळे निव्वळ संबंधित अधिष्ठात्यांचेच मानसिक खच्चीकरण झालेले नसून संपूर्ण डॉक्टरांसाठी ही अपमानास्पद गोष्ट आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ झाल्या प्रकारावर माफी मागावी अन्यथा राज्यभरातील डॉक्टर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यातून रुग्णसेवा ढेपाळल्यास सरकार जबाबदार राहिल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन ज्युनियर डॉक्टर्स नेटवर्क संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून खा. हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे हिंगोलीचे खा. हेमंत पाटिल यांनी शासकीय महाविद्यालय, नांदेड येथे जाऊन नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे तसेच डॉक्टर किशोर राठोड यांना शौचालय साफ करण्यास भाग पाडले. तसेच ते करत असताना त्याचे चित्रिकरण करुन सोशल मिडियावर वायरल देखील केले. हे घृणास्पद कृत्य असून त्याचा निषेध नोंदविण्यासाठी आयएमए नांदेड संघटनेने आयटीआय ते कलेक्टर कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. आयएमए आणि जेडिएन महाराष्ट्र संघटनेचा या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे. वरील घटनेचा निषेध करत खा. हेमंत पाटिल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बीएमसी मार्ड (BMC MARD) या मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेदेखील याचा निषेध केकला आहे. हे निंदनीय कृत्य असून सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणे, साहित्य, मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधे असूनदेखील डॉक्टर काम करत असतात. रुग्णसेवा करत असतात. मात्र या निंदनीय कृत्यामुळे एखाद्या सरकारी रुग्णालयाच्या तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याचा अपमान आहे. यातून वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा, व्यक्तीचा अपमान झाला आहे. याचा बीएमसी मार्ड तीव्र शब्दात निषेध करत आहे. या विरोधात बीएमसी मार्ड निदेर्शने करणार असून या दरम्यान आरोग्य सेवा ढासळल्यास मार्ड जबाबदार राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.  

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात