Twitter : @therajkaran
मुंबई
पूर्विची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यामध्ये बदल झाला आहे. पत्रकारिता ही सकारात्मक, विधायक दृष्टिकोन असलेली असावी. सर्वसामांन्यांच्या समस्या पत्रकारांनी मांडाव्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, मात्र, कोणालाही विनाकारण तसेच ठोस माहिती असल्याशिवाय लक्ष्य करू नये, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे मुंबई मराठी पत्रकार संघ आचार्य अत्रे पुरस्कार – २०२३ प्रदान सोहळ्यात केले.
पुरस्कार प्राप्तकर्ते ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना लाभलेला पुरस्कार हा केवळ व्यक्तीगत नाही तर पत्रकारितेच्या महान परंपरेचा सन्मान आहे, या शब्दात राज्यपाल यांनी त्यांचा गौरव केला. राज्यपाल म्हणाले, आचार्य अत्रे यांची लेखणी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा आवाज होती. अशा महान पत्रकारांच्या १२५ व्या जयंती वर्षात त्यांच्या नावाचा पुरस्कार लाभणे हे भाग्य आहे. वैद्य यांचे त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. आज इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मिडिया काळातही मुद्रित माध्यमांनी आपली विश्वासार्हता जपली आहे, याबद्दल राज्यपाल बैस यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यात अलीकडच्या काळात झालेले पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
पुरस्कारमुर्ती विजय वैद्य म्हणाले, लहानपणी मी अत्रे लिखित नाटकात भुमिका केली होती. ते अत्रे पुढे प्रत्यक्ष पाहता, वाचता,ऐकता आले हे भाग्य. आचार्य अत्रे पुन्हा जन्मास यावेत, आज त्यांची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासावर धडा असावा, अशी अपेक्षा वैद्य यांनी व्यक्त केली. आपल्याला मिळालेला हा पूरस्कार ज्यांनी घडवले त्या आईला व ज्येष्ठ बंधूंना त्यांनी अर्पण केला. मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद्र वाबळे प्रास्ताविक केले. कार्यवाह संदीप चव्हाण यांनी स्वागत केले.