मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका आयुक्तांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले असून, त्वरित योग्य तो उपाय काढण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
आज मंत्रालयात नवी मुंबई महानगरपालिकेतील ८,००० कंत्राटी सफाई कामगार आणि १,००८ ठोक मानधन व रोजंदारी तत्त्वावर कार्यरत कामगारांच्या वेतनासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी खासदार व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, कामगार विभागाचे अधिकारी आणि विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती लवकरच महानगरपालिकेस अहवाल सादर करेल, त्यानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येईल.
मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले की, कंत्राटी कामगारांचा वेतन विषय हा संबंधित महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे आयुक्तांनी या विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्वरित योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.