कराड – कराड नगरपालिकेच्या बांधकाम परवानगीसंदर्भातील भ्रष्टाचार प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सोमवार पेठेतील एका अपार्टमेंटच्या सुधारित बांधकाम परवानगीसाठी खंदारे व इतरांनी मिळकतीच्या बाजारभावाच्या १२ टक्के म्हणजेच ₹१० लाख लाचेची मागणी केली होती. यापैकी ₹५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना पालिकेचा कर्मचारी तौफिक शेख हा रंगेहाथ पकडला गेला. याप्रकरणी शेखसह तत्कालीन मुख्याधिकारी खंदारे, सहायक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे आणि खासगी व्यक्ती अजिंक्य देव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, शंकर खंदारे हे त्या वेळी मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त झालेले होते. तरीही त्यांनी व्हॉट्सअॅपवर मागील तारखेचे चलन मागवून, त्यावर स्वाक्षऱ्या करून लाच व्यवहाराला चालना दिल्याचा आरोप आहे.
या कारवाईसंदर्भात तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने २४ मार्च रोजी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विभागाच्या पथकाने पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाई केली.
तक्रारीनुसार, संबंधित प्रकल्पासाठी २०१७ मध्ये मूळ परवानगी मिळाली होती, जी नंतर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली. मात्र काम सुरू न झाल्याने सुधारित परवानगी २०२१ मध्ये घेण्यात आली. त्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा बदललेल्या नियमांनुसार नवीन अर्ज दाखल झाला होता. त्यासाठी खंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
खंदारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, मात्र ९ मे रोजी तो फेटाळण्यात आला. तरीही दोन महिने त्यांनी अटक टाळली होती. अखेर गुरुवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली व त्यांना न्यायालयात हजर करून २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सरकार पक्षातर्फे अॅड. आर. सी. शाह यांनी बाजू मांडली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.