नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात, असा थेट सवाल करत जर सरकारला वेळ मिळत नसेल तर आम्ही त्याचे लोकार्पण करु असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी सरकारला दिला.
वडेट्टीवार म्हणाले, सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी न केलेल्या कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. या सरकारला हा नैतिक अधिकार कोणी दिला? न केलेल्या कामाचे लोकार्पण करताना या सरकारला कमीपणा वाटत असावा, म्हणून नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण रखडवले आहे. या लोकार्पण सोहळ्यावर कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आम्ही हा लोकार्पण सोहळा जनतेचा पैसा न खर्च करता करू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
आघाडी सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पांची मूहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १२ वर्षे नवी मुंबईकरांनी मेट्रोची वाट पाहिली. १३,१४ ऑक्टोबर आणि त्यानंतर १७ ऑक्टोबर अशा तीन वेळा लोकार्पणासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. पण सरकारने नवी मुंबईकरांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधानांचा मुंबई दौरा झाला, त्यानंतर आता शिर्डी दौऱ्याला वेळ आहे. परंतु नवी मुंबईला यायला वेळ नाही. मग त्यांनाच वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार अजून किती दिवस जनतेला ताटकळत ठेवणार आहे. लोकार्पणाला वेळ नाही म्हणून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची सेवा जनतेला मिळत नाही, याचा खेद वाटतो, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला यावेळी कानपिचक्याही दिल्या.