Twitter : @vivekbhavsar
मुंबई
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे बहुमत असलेले पाशवी सरकार नको, असे आवाहन करत अप्रत्यक्षपणे इंडिया आघाडीला निवडून आणण्याचे आवाहन केले. हिंदुत्व, मराठा, धनगर आरक्षण, मराठी माणूस या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी भाजपच्या भ्रष्ट प्रवृत्तीची त्यांच्या भाषणातून पोलखोल केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दादरच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याच्या स्पर्धेतून माघार घेतल्याने मूळ शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच दादरच्या शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा मेळावा घेण्याची संधी मिळाली. मेळाव्याला उपस्थित हजारोंचा जनसमुदाय हा उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी शिवसैनिक असल्याचे दर्शवत होते.
हुकूमशाही हिटलरचा उदय आणि पतनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांच्या घराण्याचा इतिहास आपल्याला माहीत नसतो, ते देशाला खड्ड्यात घालून झोळी घेऊन निघून जातात. हिटलर आपल्या देशात जन्माला आला याची जर्मनांना अजूनही लाज वाटते, असे सांगून, ज्याच्या कुटुंबाची आपल्याला माहिती नाही अशा व्यक्तीच्या हातात आपण देश देणार आहोत का? असा सवाल करत ठाकरे यांनी एक प्रकारे मोदी यांच्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा केंद्रात अनेक पक्षांचे आघाड्यांचे सरकार असते, तेव्हा ते योग्य काम करतात. नरसिंहराव, डॉ मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तम काम केले. मात्र या देशात एकाच पक्षाचे पाशवी बहुमताचे सरकार आले, तरीही देशात स्थैर्य कुठे आहे? त्यामुळे यापुढे एक पक्षाचे सरकार नको तर आघाडीचे सरकार हवे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
आघाडीतील नेत्यांच्या होणाऱ्या चौकशीचा थेट उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले, पुढचं सरकार आमचे येणार आहे, त्यावेळी लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ते पुढे म्हणाले, मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईच्या कारभारावर नीती आयोगाचं नियंत्रण ठेवले जाणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत मुंबईच्या पालकमंत्र्यांनी कार्यालय उघडले, याची आठवण करून देताना ते म्हणाले की, पालिकेत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे.
हे आमच्या सरकारची चौकशी करतात, करू द्या, पण मग ठाणे महापालिका आणि अन्य महापालिकेतील देखील भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली, पीएम केअर फंडामध्ये किती पैसा आला, कुठून देणग्या मिळाल्या, त्याचा विनियोग कसा झाला, याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

कोविड काळात मुंबई महापालिकेने अत्यंत उत्तम काम केले, त्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली, याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, आज धारावी विकायला काढली आहे. अदानी यांचा उल्लेख न करता ते म्हणाले, भाजप सरकारने त्यांच्या मित्राला धारावी आंदण केली आहे आणि त्यातून मिळणारा एफएसआय हा दक्षिण मुंबईत वापरण्याची मुभा दिलेली आहे. धारावीकरांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी झाले पाहिजे, त्यांच्या सूक्ष्म लघु उद्योगाला त्याच ठिकाणी जागा मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
बांद्रा येथील सरकारी निवासस्थानाच्या पुनर्विकासाचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता, असे सांगून ते म्हणाले की, नव्याने येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनादेखील बांद्रा येथे त्याच जागेवर सरकारी निवासस्थान मिळाले पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
विद्यमान सरकारने एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेतला, त्याचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्यक्षात पिक विमाची भरपाई देण्याची वेळ आली तेव्हा या विमा कंपन्यांनी हात वर केले. शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केले की, या विमा कंपन्या कोणाच्या आहेत त्या शोधा, त्यांच्या कार्यालयात जाऊन बसा आणि त्यांना घेराव घाला आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा.

उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली, त्यावेळी मोदींनी या आघाडीची तुलना इंडिया मुजाहिदीनशी केली. देशाचा पंतप्रधान अशा प्रकारे वक्तव्य करतो, याची आम्हाला लाज वाटते, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीपेक्षा भाजपच कशी जास्त देशद्रोही आहे, हे सांगताना अनेक उदाहरणे दिली.
सीमेवर पाकिस्तानच्या गोळीला भारतीय जवान बळी पडत असताना, शहीद होत असताना अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर फुलांची पुष्पवृष्टी स्वागत केले जात आहे. या क्रिकेटपटूंना वाटत असेल की ते भारतात नव्हे तर भाजपमध्ये आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना सूचना केली की, तुम्ही या सरकारवर विश्वास ठेवू नका. मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पाकिस्तानला देशाची गुपित विकणाऱ्या कुरुलकर याचा उल्लेख करून उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भाजपची कुरुलकरबद्दल काय भूमिका आहे हे त्यांनी अजूनही स्पष्ट केलेले नाही. भाजपमधील आयाराम लोकांना संधी दिली जात असल्याबद्दल टीका करताना ठाकरे म्हणाले की, भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी किती काळ फक्त सतरंज्याच उचलायच्या याचा विचार करावा.
न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्यांच्या वडिलांच्या न्यायप्रियतेचा उल्लेख करून उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाला न जुमानणारे काही लोक आमदारांच्या अपात्रतेवर अजूनही निर्णय घेत नाहीत, केवळ तारीख पे तारीख सुरू आहे. यांच्या हिंमत असेल तर त्यांनी मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभेची एकत्र निवडणूक घेऊन दाखवावी. मात्र ते घाबरतात आणि म्हणूनच मुंबई सिनेटची निवडणूक देखील घेणे त्यांनी टाळले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.