मुंबई – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले असताना प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाई ओतण्यात आली, त्यांना गाडीतून बाहेर खेचून काळे फासण्यात आले. हा प्रकार म्हणजे जिवे मारण्याचाच प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी यासंदर्भात विधानसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, हल्ला करणारा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हाही दाखल आहे तसेच चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी त्याने कारावास भोगला आहे. अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, याची माहिती गुप्तचर विभागाला नव्हती का? कार्यक्रमासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त का नव्हता? यावरही त्यांनी सवाल उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.