मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षातील गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला – “मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये तुमची तयारी ठेवा. मनसेसोबत चर्चा सुरू आहे, मात्र युतीचा निर्णय आम्ही घेऊ. तयारी मात्र पूर्ण हवी. गरज पडली तर मदत त्यांनाही झाली पाहिजे.”
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला शंभर दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना हजेरी लावून निवडणूक रणशिंग फुंकले.
”भाजपला ठाकरेच का खटकतात?”
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “भाजप राष्ट्रवादीवर टीका करत नाही, काँग्रेसवर टीका करत नाही. त्यांना टिकेला फक्त ठाकरे लागतात. हेच तुमच्या ताकदीचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, विरोधकांना या निवडणुकीत आपल्याला गाडायचं आहे.”
यावेळी त्यांनी भाजप-शिंदे गट सरकारवरही ताशेरे ओढले. “भाजपने आपला पक्ष आणि आपलं चिन्ह चोरलं. लोकशाहीत न बसणाऱ्या कारवाया केल्या. मात्र जनता खरी शिवसेना कोणती ते ओळखते,” असे ते म्हणाले.
”परत येणाऱ्यांना उमेदवारी नाही”
पक्षशक्ती एकत्र करण्यावर भर देताना उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला – “जे आपल्याला सोडून गेलेत आणि आता परत यायचा प्रयत्न करतील, त्यांना उमेदवारी मिळणार नाही. गटप्रमुख आणि शाखाप्रमुख हेच आपले जीव की प्राण आहेत. यांच्याच भरोशावर आपण ही निवडणूक जिंकू.”
मनसे युतीवरून राजकीय उत्सुकता
मनसेसोबतच्या संभाव्य युतीवरून राज्यात प्रचंड चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी आज त्याला अधिकृत स्वर दिला. “मनसेसोबत चर्चा सुरू आहे. पण युतीबाबतचा अंतिम निर्णय आम्ही घेऊ. मात्र प्रत्येक वॉर्डात तयारी मात्र तडफदार असली पाहिजे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.
पार्श्वभूमी : शिवसेना-भाजप वैर आणि मुंबईचा प्रश्न
२०१९ नंतर भाजप-शिवसेना वैराने महाराष्ट्राची राजकारण दिशा पालटली. मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावरून झालेल्या फाटाफुटीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापली. शिवसेनेचे नाव, निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ भाजपच्या मदतीने शिंदे गटाकडे गेले. मात्र उद्धव ठाकरे यांनी “आपण खरी शिवसेना” हा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा स्वतंत्र पक्ष उभा केला.
मुंबई महापालिकेवर २५ वर्षे सत्ता गाजविल्यानंतर या वेळी उद्धव ठाकरेंसमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे. भाजप आणि शिंदे गट मुंबईवर झडप घालण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची ताकद असली तरी स्थानिक पातळीवर मनसेसोबत युतीचा पर्याय उद्धव ठाकरेंनी खुला ठेवला आहे.
”१०० दिवसांत विजयाचा पाया रचा”
बैठकीच्या अखेरीस उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना स्फूर्ती दिली – “निवडणुकीला फक्त १०० दिवस उरले आहेत. प्रत्येकाने जोमाने तयारीला लागा. विरोधकांनी आपल्याला गाडायचं ठरवलं आहे, पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आपण ही लढाई जिंकणारच.”