मुंबई : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण १२ शिवदुर्गांचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘शिवदुर्गाची युनेस्को भरारी’ या अभिमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले कल्चरल सेंटर तर्फे आयोजित हा कार्यक्रम सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.
या कार्यक्रमात, ज्येष्ठ इतिहास आणि दुर्ग अभ्यासक पराग लिमये हे, युनेस्को मान्यताप्राप्त १२ गडकोटांच्या ऐतिहासिक, युद्धनीतीसंबंधित आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहिती कथनाच्या माध्यमातून सादर करतील. शिवकालीन युद्धनीती, गडांचा सामरिक उपयोग, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीपूर्ण धोरण या सगळ्यांचा व्यापक आढावा या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे.
तसंच, या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, कर्तृत्व आणि नीतीमूल्यांना उजाळा देणारी अनेक शिवस्फूर्ती गीते सादर होणार आहेत. काव्या खेडेकर, अथर्व कर्णिक, वैदेही परांजपे, हर्षवर्धन गोरे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे, मंदार आपटे, ऋषिकेश रानडे आणि मिलिंद करमरकर हे सुप्रसिद्ध गायक कलाकार या संगीत महोत्सवात आपली कला सादर करतील.
कार्यक्रम विनामूल्य असून, प्रवेशिका रविवारी, १० ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून दीनानाथ नाट्यगृहाच्या ठिकाणी उपलब्ध असतील. सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व विलेपार्ल्याचे आमदार ॲड. पराग अळवणी यांनी केले आहे