महाड: महाडहून पुण्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी (राजेवाडी–वरंधा–भोर–महाड) या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून दरड कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे यंदाही पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरंधा घाटाचे काम अजून किती वर्षे चालणार? असा सवाल स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्ग प्रशासनाला विचारत आहेत.
महाड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग गेल्या चार वर्षांपासून रुंदीकरणाच्या कामामुळे त्रस्त आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वरंधा घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता कायम असल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो.
महाड हद्दीतील पारमाची, माझेरी परिसरात रस्त्याचे काही काम पूर्ण झाले असले तरी २०२१ मध्ये येथे रस्ता वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून पावसाळ्यात हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला जातो.
मागील वर्षी १ जून २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. यंदाही तसाच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्हा हद्दीतील बहुतांश काम पूर्णत्वाकडे गेले असले तरी पुणे जिल्हा हद्दीतील काम अद्याप अपूर्ण असल्याने हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी कधी खुला होणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यावर निर्णय?
पावसाळ्यात हवामान खात्याकडून रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नसल्यास घाट हलक्या वाहनांसाठी खुला ठेवता येऊ शकतो, असे शासनाच्या काही परिपत्रकांत नमूद असले तरी दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सावध भूमिका घेत मार्ग बंद ठेवते.
पर्यायी मार्ग
मार्ग बंद असल्यास वाहतूक खालील पर्यायी मार्गांनी वळवली जाते:
• पुण्याकडे – माणगाव – निजामपूर – ताम्हणी घाट – मुळशी – पिरंगुट – पुणे
• कोल्हापूरकडे – राजेवाडी फाटा – पोलादपूर – महाबळेश्वर – वाई – सातारा – कराड – कोल्हापूर
• दुसरा पर्याय – राजेवाडी फाटा – पोलादपूर – खेड – चिपळूण – पाटण – कराड – कोल्हापूर
स्थानिकांचा संताप
दरवर्षी पावसाळ्यात घाट बंद केल्यामुळे रायगड व पुणे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटतो, तसेच पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि एसटी बससेवा यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
रायगडचे खासदार आणि भोर परिसराचा समावेश असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांकडेही स्थानिकांनी लक्ष वेधले आहे. मात्र चार वर्षांपासून हा प्रश्न कायम असल्याने नागरिक संतप्त असल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले अभियंता?
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले की रायगड हद्दीतील बहुतांश काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र पुणे जिल्हा हद्दीतील काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात हा मार्ग बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

