वसई -भाईंदर रो -रो सेवेचा बुधवारी शुभारंभ
X : @milindmane70
मुंबई: वसई, विरार, नालासोपारा या परिसरातील नागरिकांची मुंबई व ठाण्याकडे येतांना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने 20 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर वसई ते भाईंदर रो रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू केली जात आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिलेल्या माहितीनुसार वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर 20 फेब्रुवारीपासून रो रो फेरी बोट सेवा सुरू केली जात आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीस ही सेवा सुरू करण्याचा ठेका देण्यात आला आहे.
या रोरो प्रवासी फेरीबोटमधून एकाच फेरीत 100 प्रवासी आणि 33 गाड्या वाहून नेण्याची क्षमता असेल. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीला कोकण किनारपट्टीवर राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड या खाड्यांमध्ये रोरो फेरी बोट सेवा चालवण्याचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. वसई ते भाईंदर या फेरी बोट सेवेकरिता प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी तिकीट दर ठरविण्यात आले आहेत.
दर पुढील प्रमाणे आहेत: मोटर सायकल (चालकासह) – 60 रुपये,
रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर (चालकासह) – 100 रुपये
चार चाकी वाहन (कार चालकासह) – 180 रुपये
मासे, पक्षी, कोंबडी, फळे, (प्रति टोपली) व कुत्रा, शेळी, मेंढी – प्रति नग 40 रुपये
प्रवासी प्रौढ (बारा वर्षावरील) – 30 रुपये
प्रवासी लहान (तीन ते बारा वर्षापर्यंत) – 15 रुपये
वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर ही फेरी बोट सेवा चालू होण्यामुळे मुंबई व ठाण्याकडे जाणाऱ्या वसई, विरार व नालासोपारा या उपनगराकडे जाणाऱ्या वाहतूकदारांची वाहतूक कोंडीतून सुटका होईलच, परंतु वेळ व इंधनाची बचत करून फेरीबोट सेवेमुळे पर्यावरणाचे देखील संतुलन राखले जाणार आहे. त्यामुळे ही सेवा कायमस्वरूपी चालू राहावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Also Read: ‘मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, विशेष अधिवेशनाचा केवळ फार्स’; विरोधकांचं टीकास्त्र