नवी मुंबई — नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील वैदर्भीयांची सामाजिक-सांस्कृतिक ओळख असलेल्या आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आयोजित चौथे स्नेहसंमेलन खारघर येथे उत्साहात पार पडले. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचा सातत्याने विस्तार होत असून, वैदर्भीयांना एकत्र आणणे, संस्कृतीची जपणूक करणे आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी खारघर येथील उत्कर्ष सभागृहात झालेल्या या स्नेहसंमेलनास वैदर्भीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी न्यायाधीश आणि राज्याचे माजी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी भुषवले. आपला विदर्भ संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोहाड, कोषाध्यक्ष अनंत शिंदे आणि न्यायमूर्ती तरारे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैदर्भीयांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात अद्यापही तरुणाईला लाजवेल अशा जोशात कार्यरत ९४ वर्षीय यशवंतराव ठाकरे यांचा जीवन गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. मूळ चंद्रपूरचे असलेले ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेत नोकरी केली. सन १९७९ मध्ये ते हाफकिन संस्थेत अधिकारी म्हणून रुजू झाले, आणि निवृत्तीनंतर पनवेलमध्ये वास्तव्यास आहेत. सत्कार स्वीकारताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत बालपणी भजन गायल्याची आठवण सांगून उपस्थितांचे लक्ष वेधले.
अध्यक्ष ॲड. कोहाड यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनची वाटचाल उलगडून सांगितली. सरचिटणीस प्रमोद चुंचूवार यांनी भावी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची माहिती देत अधिकाधिक वैदर्भीयांनी आजीवन सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन केले. मनोज ठाकरे यांनी नवी मुंबईतील भूखंड खरेदी आणि गुंतवणुकीच्या संधींची माहिती दिली. यानंतर सदस्यांचे परिचय सत्र पार पडले.
या स्नेहसंमेलनात खालील वैदर्भीयांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र मुधोळकर — मनोरंजन क्षेत्र (स्टार प्रवाह), वैशाली पाटील (समाजसेवा), डॉ. राजेश शिंदे (कर्करोग उपचार व संशोधन), डॉ. विनोद चव्हाण (श्वसनरोग उपचार), प्रशांत काळे (डिजिटल जाहिरात क्षेत्र), आशिष हेडाऊ — JSW अभियंता; अमेरिकेत तंत्रज्ञ प्रशिक्षणासाठी विशेष योगदान, डॉ. अनिल नहाते — कोरियातील आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी स्पर्धेत विजय, तसेच 10वी आणि 12वीत विशेष गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी सादर केलेल्या गीतांनी संमेलनाला एक वेगळीच लय दिली. बाळगोपाळांनी सादर केलेल्या नृत्य-गीते यांनी सभागृहात उत्साह निर्माण केला. उपाध्यक्ष अश्विनी हडपे, कार्यकारिणी सदस्य सुरेश डाखोळे, गायिका एकता ठाकरे, विरेंद्र कठाणे यांनी संगीत संध्येला विशेष रंग दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव राजेंद्र नंदनकर, उपाध्यक्ष किशोर गुल्हाने, अश्विनी हडपे, आणि कार्यकारिणी सदस्य प्रशांत जांभूळकर, अनिल नहाते, राजेश सोनकुसरे, विरेंद्र कठाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
वऱ्हाडी भाषेला देश-विदेशात लोकप्रियता मिळवून देणारे कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे संमेलनाच्या एक दिवस आधी निधन झाले. संस्थेमार्फत त्यांच्या साहित्ययोगाला मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.
गजानन झोडपे यांनी बेग यांचा जीवनपरिचय कथन करून सभागृहाला भावुक केले.

