विनायकराव मेटे यांच्या जयंतीत भावनिक अभिवादन; डॉ. ज्योती मेटे यांचा ठाम संदेश
मुंबई : एक काळ होता… पोटाची खळगी भरण्यासाठी बीड जिल्ह्यातून मुंबईत आलेला एक युवक, पुढे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी आवाज उठवणारा नेता झाला. शेतकरी पेन्शन, व्यसनमुक्ती अभियान, शिवस्मारक किंवा सामाजिक न्याय – प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहणारा तो नेता म्हणजेच लोकनेते विनायकराव मेटे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींनी पुन्हा एकदा सभागृह ओथंबून निघाले.
विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त “आठवणीतील मेटे साहेब” हा अभिवादन कार्यक्रम मुंबईतील वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात पार पडला. कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि चाहत्यांनी गर्दी केली होती.

यावेळी अनेकांनी मेटे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. पण यावेळी सर्वांचे लक्ष वेधले ते शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांच्या आक्रमक भाषणाने. नेहमी संयम राखणाऱ्या डॉ. मेटे आज भावनांच्या भरात बोलल्या.
त्यांनी म्हटले, “विनायकराव मेटे यांच्या जयंतीला इतरांसाठी ती फक्त एक तारीख असेल, पण माझ्यासाठी ही दुर्दैवाची वेळ आहे. पतीची आठवण साजरी करणं ही काळजाला घालणारी वेदना आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता, पुन्हा लढा उभा करायचा आहे.”
त्यांनी पुढे ठामपणे सांगितले, “मेटे साहेबांनी संघटनेवर ज्या निष्ठेने प्रेम केलं, त्याला तोड नाही. जर कुणाला निष्ठा काय असते ते शिकायचं असेल, तर त्यांनी शिवसंग्रामकडे पाहावं. तुमच्या विश्वासावर मी खरी उतरते, याची मला खात्री आहे.”
डॉ. मेटे यांनी जाहीर केले की, शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा विमा याही वर्षी उतरवला आहे.
“कार्यकर्त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपायचं असेल, तर त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहायला हवं. हेच आम्ही करत आहोत.”
त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातही भावनिक उद्गार काढले. “मराठा आरक्षणासाठी मेटे साहेबांनी केलेल्या लढ्याची मी साक्षीदार आहे. त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारे आज फोटो टाळतात, नाव घेत नाहीत, हे दुर्दैव आहे. पण आम्ही त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेणार आहोत,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
सभागृह ठसाठस भरलेले, सभागृहाबाहेरही गर्दी
सकाळपासूनच वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू होताच सभागृह ठसाठस भरले, इतकंच नव्हे तर सभागृहाबाहेरही शेकडो शिवसंग्राम मावळ्यांनी उभं राहत मेटे साहेबांना अभिवादन केलं.
या गर्दीतून शिवसंग्रामच्या मुंबईतील संघटनात्मक ताकदीचं दर्शन घडलं.
‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची उपस्थिती
या अभिवादन कार्यक्रमाला सुप्रसिद्ध ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनीही आवर्जून हजेरी लावली.
“मेटे साहेबांच्या प्रेमाखातर मी आज इथे आलोय,” असं सांगताच सभागृहात संभाजी महाराजांच्या घोषणांनी एकच जल्लोष झाला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये आयएएस अधिकारी निर्मलकुमार देशमुख, मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता नवनाथ घाडगे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रमोद हिंदूराव, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, नगरसेवक अनिल भोसले, संजय सिंघन आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ नेते नारायणराव काशीद यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश विचारे यांनी मानले.
“मेटे साहेब गेले पण संघटनेचा लढा सुरूच राहील” असा विश्वास देत कार्यक्रमाला अत्यंत भावनिक वळण लागले.