मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, बियाणे संदर्भात शेतकरी वर्गाला अपेक्षित असलेल्या तरतुदींचा समावेश असलेला सशक्त कायदा सरकार करणार असल्याची घोषणा कृषी राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांनी आज विधानसभेत केली.
भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहात ‘बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) अशासकीय विधेयक’ मांडले. त्यांनी लक्ष वेधले की, राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विषय अतिशय गंभीर आहे आणि त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे मिळणारी निकृष्ट बियाणे. सध्या अस्तित्वात असलेल्या बियाणे कायद्यात सुधारणा करून तो अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री जैस्वाल म्हणाले, “हा विषय राज्यासाठी अत्यंत गंभीर आहे. राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत यासंदर्भात बैठक झाली असून लवकरच मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा होणार आहे. या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बियाणे कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करण्यात येईल.”
राज्यमंत्री जैस्वाल यांच्या या घोषणेनंतर समाधान व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी आपले अशासकीय विधेयक मागे घेतले.