छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील हडकोमधील संत सेना भवन येथे पार पडली. यावेळी प्रांताध्यक्ष कल्याणराव दळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तीव्र लढा उभारण्यात येणार असून त्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी आणि आक्रमक संघटन बांधणी आवश्यक आहे.
प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून संघटनेत ६० टक्के प्रतिनिधित्व युवकांना देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला. त्यांनी सांगितले की, बारा बलुतेदार समाजाच्या मदतीने ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सक्षम केली जाणार आहे.
दळे म्हणाले, “बारा बलुतेदार समाजातील मायक्रो ओबीसी घटकांना खूश करण्यासाठी शासनाने विश्वकर्मा योजना, विविध महामंडळांच्या घोषणा, महाज्योती यांसारख्या योजना जाहीर केल्या; मात्र लाभ मिळवण्यासाठी अशक्य अटी घालण्यात आल्या आहेत आणि निधी अपुरा आहे. वीर जिवाजी महाले, शिवरत्न शिवाजी काशीद, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकांसंदर्भात शासन केवळ घोषणा करत असून कोणतीही ठोस कृती नाही. ओबीसी आरक्षण आणि रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीबाबत शासनाचे धोरण उदासीन आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांना शिक्षण व प्रशिक्षण देऊन शासनाविरोधात लढण्यासाठी सक्षम करण्याचा आणि संघटनेत नेतृत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
या बैठकीत संघटनेचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, सरचिटणीस पांडुरंग भवर, कर्मचारी संघटनेचे उत्तमराव सोलाने, माजी महापौर भगवानराव वाघमारे, अॅड. सोपानराव शेजवळकर, सतिष जयकर, माऊली गायकवाड, नंदिनी शेजवळ, ताराबाई वखरे यांची उपस्थिती होती.
बैठकीत मागील इतिवृत्त वाचून त्यास मान्यता देण्यात आली. तसेच पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा दौरा घेण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. वीर जिवाजी महाले, शिवरत्न शिवाजी काशीद, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकाच्या प्रश्नावर शासनाच्या उदासीन धोरणावर चर्चा झाली. महाज्योती योजनेत नाभिक समाजाला मिळणाऱ्या सवलतींबाबत अडथळे दूर करण्यावर भर देण्यात आला.
ओबीसी आरक्षण, रोहिणी आयोग आणि शासनाच्या भूमिकेची स्पष्टता समाजात पोहोचवण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले. महाज्योती व केशशिल्पी योजनेतील अटी रद्द करून लाभ अधिक सुलभ करण्याची मागणी बैठकीत झाली.
याशिवाय, भारत सरकारने जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न बहाल केल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आला.
या बैठकीस राज्यभरातून कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभिक भाषण छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांनी केले तर आभार बळीराम वैद्य यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाबासाहेब अपार, सचिन गायकवाड, नितीन वाघ, अशोक गायकवाड, गणेश मोहिते, भाऊसाहेब सोनवणे, बंटी बोर्डे, रवींद्र सहज, उमाकांत वैद्य आणि जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी विशेष प्रयत्न केले.