मुंबईतच खटला चालणार; मजबूत पुराव्यांमुळे पाकिस्तानचा सहभाग सिद्ध – मुख्यमंत्री फडणवीस
नवी दिल्ली – 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार तहव्वूर राणा याला भारतात प्रत्यार्पित करण्यास अमेरिका सरकारने संमती दिली आहे. “हा खटला मुंबईत चालणार असून अंतिम न्यायाच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
ते आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कायदा-सुव्यवस्था आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच अमेरिकेने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास संमती दिली आहे. मी त्यांचे आभार मानतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “आम्ही गेल्यावेळी राणाची ऑनलाईन साक्ष घेतली, त्यामुळे या प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे सिद्ध करण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.
मुंबईतच तहव्वूर राणावर खटला दाखल होणार असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी डेव्हिड हेडली याचा निकटवर्तीय असलेल्या तहव्वूर राणावर खटला मुंबईत चालवला जाणार आहे. त्याला मुंबईतच तुरुंगात ठेवण्याची सर्व तयारी झाली आहे.
पत्रकारांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत विचारणा केली असता, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कसाबला आम्ही मुंबईच्या जेलमध्ये ठेऊ शकलो, तर तहव्वूर राणा कोण?”
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्रात भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य संहिता या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. 27 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत असून, पुढील 6 महिन्यांत संपूर्ण नेटवर्क तयार होणार आहे. पोलिस दलाच्या 90% कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित प्रशिक्षण 31 मार्चपूर्वी पूर्ण होईल. आरोपींना वारंवार न्यायालयात नेण्याऐवजी तुरुंगातच ऑनलाईन साक्षीसाठी क्युबिकल्स उभारले जातील.
दरम्यान, 26/11 हल्ल्यातील आरोपींना अंतिम न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला ऐतिहासिक महत्त्व आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात आणखी कठोर कारवाईचे संकेत दिले.