मुंबई – मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. मार्च २०२५ मध्ये राज्यात एकूण २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी विधानसभेत आज लेखी उत्तराद्वारे मान्य केले. याचप्रमाणे एप्रिल महिन्यातही २२९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांत ४७९ शेतकरी आत्महत्यांचे गंभीर चित्र समोर आले आहे.
मार्च महिन्यातील माहिती:
मार्च २०२५ मध्ये नोंदवण्यात आलेल्या २५० आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ १०२ प्रकरणे शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरवण्यात आली. त्यामध्येही ७७ कुटुंबांनाच प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. उर्वरित २५ पात्र प्रकरणांतील मदतीसंबंधी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, ६२ प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले असून, ८६ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.
एप्रिल महिन्यातील माहिती:
एप्रिल २०२५ मध्ये २२९ शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ ७४ प्रकरणे पात्र, ३१ अपात्र आणि तब्बल १२४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र ठरलेल्या ७४ प्रकरणांतील केवळ ३३ कुटुंबांनाच आतापर्यंत आर्थिक मदत देण्यात आली असून, उर्वरित ४१ प्रकरणांमध्ये अद्याप कार्यवाही सुरु आहे.
या संपूर्ण विषयावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार व इतर ३४ आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लेखी उत्तर देताना मंत्री मकरंद जाधव यांनी ही माहिती दिली.
वाढीव मदतीबाबत सरकारचा नकार:
शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना वन्य प्राणी हल्ल्यांत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणाऱ्या वाढीव मदतीच्या धर्तीवर मदत देण्याचा कोणताही प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन नाही, असे स्पष्ट करून सरकारने अशा कुटुंबांवरील दुहेरी अन्याय अधोरेखित केला आहे.