महाराष्ट्र ताज्या बातम्या

धाराशीव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची अर्चना पाटील यांना उमेदवारी

X: @therajkaran

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा

मुंबई: महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात सौ. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी गुरुवारी केली. तत्पूर्वी सौ.पाटील यांना या लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत पक्षात प्रवेश देण्यात आला.

महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याने मतदारसंघात एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. त्यामूळे की काय शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळेल त्याच धर्तीवर धाराशीव मतदारसंघात सौ. पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिल्याने ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे, असा सणसणीत टोला तटकरे यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

शरद पवार यांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला असून आता आम्ही त्या ऐवजी स्व. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली असून काही जणांकडून यासंदर्भात जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणाही साधला.

या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आ. राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, राजाभाऊ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ सतीश चव्हाण, आ विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महायुती लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने त्यांना याठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार सापडेनात. त्यामूळेच कधी काळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले व राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहीलेले पण सध्या भाजपवासी असलेले आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र डॉ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणून उमेदवारी देण्यात आल्याने पक्ष अजित पवारांचा पण उमेदवार भाजपचा अशी खमंग चर्चा धाराशिव मतदारसंघातील बहुतांश कार्यकर्ते व पदाधिकारी पक्ष कार्यालयाच्या आत व बाहेरही खुले आमपणे करताना दिसत होते.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात