महाराष्ट्र ताज्या बातम्या

उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकरांचे नाव घोषित; दोन घोटाळेबाजांमधून एक निवडण्याची मतदारांवर वेळ

X: @ajaaysaroj

मुंबई: खिचडी घोटाळ्यात गाजत असलेल्या उबाठा गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्यासमोर शिवसेनेने भूखंड घोटाळ्यात गाजत असलेले रवींद्र वायकर यांची उमेदवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात घोषित केली आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या दोन घोटाळेबाजांमधून एक घोटाळेबाज आता मतदारांना निवडावा लागणार आहे. सर्वपक्षीय राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे या मतदारसंघातील लढत ठरणार आहे.

निवडणुकीच्या राजकारणात केवळ निवडून येण्याची क्षमता, इलेक्टोरल मेरिट या एकमेव निकषांवर घोटाळेबाजांना उमेदवारी देण्याची नामुष्की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवर आली आहे. मतदारांना गृहीत धरणारे एवढे गेंड्याच्या कातडीचे राजकीय पक्ष केवळ भारतातच असू शकतील. दुर्दैवाने नाईलाजास्तव याच घोटाळेबाजांमधून एकाला निवडून देण्याची वेळ मतदारांवर आली आहे. याला पर्याय म्हणून नोटाला मतदान करावे हे फक्त बोलण्या पुरताच ठीक आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून उत्तर भारतीय नेते, माजी खासदार संजय निरुपम प्रयत्नशील होते. मात्र भाजपच्या विरोधामुळे ते होऊ शकले नाही. संजय निरुपम यांच्या रूपाने एक तगडा उत्तर भारतीय नेता शिवसेनेत, पर्यायाने महायुतीमध्ये आला तर आपले ठराविक वर्तुळात असलेले महत्व कमी होईल अशी सार्थ भीती भाजपच्या एका वादग्रस्त उत्तर भारतीय नेत्याला होती, त्यामुळेच त्याने निरुपम यांच्या शिवसेना प्रवेशाला कडाडून विरोध केला व ही उमेदवारी निरुपम यांना मिळू नये म्हणून थेट राज्यातील भाजपच्या सर्वेसर्वा असणाऱ्या नेत्याच्या नाकदुऱ्या काढल्या, आणि निरुपम यांचे शिंदे गटात सामील होणे थांबवले असे बोलले जाते. शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी पण अंतिमतः भाजपचे नेतेच ठरवतात ही राज्यभर सुरू असलेली चर्चा खरी आहे हे देखील या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.

उबाठा गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे दोघेही ईडीच्या चकरा मारून आले असून त्यांच्या चौकश्या सुरू आहेत. वायकरांना स्वतःला ही निवडणूक लढवण्याची अजिबात इच्छा नव्हती हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. देव जे देईल ते मी स्वीकारले आहे, माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. रिंगणात उतरण्यापूर्वीच हरलेली मानसिकता असणारा उमेदवार शिंदे यांनी, पर्यायाने महायुतीने का दिला हे आश्चर्य आहे. उबाठा गटाच्या अमोल कीर्तिकर यांचे वडील, याच मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे केवळ नावापुरतेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यांचा काडीमात्र फायदा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार वायकर यांना होणार नाही हे शेंबड पोर सुद्धा सांगू शकेल. त्यामुळे अनेक मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघात देखील शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपलाच जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या मध्ये स्वतः रवींद्र वायकर शिवसेना, विद्या ठाकूर, भारती लव्हेकर व अमित साटम हे तीन जण भाजप असे एकूण चारजण महायुतीचे आमदार आहेत. तर उबाठा गटाकडे सुनील प्रभू व ऋतुजा लटके हे दोन आमदार आहेत. वायकर हे शिंदेंच्या बंडानंतर त्यांच्या बरोबर शिंदेंकडे आलेले नाहीत तर ईडीचा ससेमिरा टाळण्यासाठी मजबुरीने शिवसेना शिंदे गटात आले आहेत हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. अर्थात वायकर मात्र हे नाकारतात, त्यांचे म्हणणे असे आहे की शिंदे गटात प्रवेश घेण्यापूर्वीच त्यांना सर्वोच्च न्यालालयाने क्लीन चिट दिली आहे. त्यांच्या बरोबर किती शिवसैनिक शिंदे गटात आले आहेत, ते वायकरांना कितपत मदत करतील या बद्दल स्वतः वायकरच साशंक असतील. त्याच प्रमाणे या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य आहे.

निरुपम यांना मिळालेला नकार, शिवसेनेकडे गेलेली जागा, यामुळे भाजपला मतदान करणारा बहुतांश उत्तर भारतीय मतदार कोणाकडे झुकतो, मतदानाला कितपत उतरतो हे बघणे पण महत्वाचे ठरणार आहे. अर्थात एक गोष्ट इथे मान्य करावी लागेल की जोगेश्वरीमध्ये असणाऱ्या मुस्लिम बहुल भागातून वायकरांना नेहमीच शिवसेनेत असताना देखील लक्षणीय मतदान होत असते. गजानन कीर्तिकर हे जरी महायुतीच्या वायकरांचा प्रचार करणार आहेत असे मीडियाला सांगत असले तरी ईडीच्या सुरू असलेल्या कारवायांमुळे ते प्रचंड नाराज आहेत, भाजपच्या नेतृत्वाला ते खुलेआम नाव ठेवत आहेत. त्यांची मदत वायकरांना किती होईल याबद्दल महायुतीच्या गोटात साशंकता आहेच. अंधेरी पश्चिम, वर्सोवा आणि गोरेगांव या तीन मतदारसंघात कोणाला मताधिक्य मिळते, वायकर इथून किती मतं घेऊ शकतात, तसेच अंधेरी पूर्व आणि दिंडोशी येथून अमोल कीर्तिकर किती मतं घेऊ शकतात, या दोन मतदारसंघात कोण मताधिक्य घेते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. येथील सहाही विधानसभा मतदारसंघ भाजप आणि एकसंघ शिवसेनेकडे होते, आता मात्र शिवसेनेच्या महाफुटीनंतर येथील गणित बदललेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल गजानन कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर या दोन शिवसैनिकांमधील लढत चुरशीची ठरणार आहे हे निश्चित.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात