मुंबई : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji nagar) शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. तब्बल 25 वर्षानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती मशाल आली आहे. 25 वर्षांपूर्वी अपक्ष मोरेश्वर सावे यांच्या रूपाने संभाजीनगरात पेटलेली मशाल यंदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पुन्हा पेटवतात का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर महाराष्ट्रात सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिवसेना विभागली गेली आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणूक आयोगाने बहाल केले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह घेऊन लोकसभेची निवडणूक लढवावी लागत आहे. याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये 1988 च्या महापालिका निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून देत येथील जनतेने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रखर हिंदुत्ववादाला पसंती दिली होती.
या महापालिकेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिवसेनेने 1989 च्या लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार रिंगणात उतरवला. मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने पुरस्कृत करत अपक्ष उमेदवारी दाखल करायला सांगितले. त्यावेळी निवडणूक आयोगाने सावे यांना मशाल चिन्ह दिले होते. सावे यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. या सभेचे गारुड असे काही चालले की अपक्ष मोरेश्वर सावे संभाजीनगरमधून निवडून आले होते. आता पंचवीस वर्षानंतर जिल्ह्याचे आणि राज्याचे राजकारण बदलले आहे. आता सावे यांच्या विजयाची पुनरावृत्ती होणार का ?याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणुकीत पक्षचिन्ह महत्वाचे नसते तर उमेदवार आणि व्यक्ती महत्त्वाची असते, असे सांगत आपण स्वतः अनेक निवडणूक चिन्हांवर विजयी झाल्याचे उदाहरण दिले आहे. या पार्श्वभूमीवर 25 वर्षांपूर्वी मशाल चिन्हावर लढलेल्या शिवसेनेला हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे अवघड नसल्याचे बोलले जात आहे .