मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला चितपट करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे माढ्यात आपला उमेदवार निवडून आणण्याच मोठं आव्हान भाजपासमोर निर्माण झालं. दरम्यान उत्तमराव जानकर पवार गटाकडे झुकले आहेत. त्यामुळे भाजपाने (bjp) आता शरद पवार गटाला चितपट करण्यासाठी शरद पवारांचे विश्वासू अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पवारांना मोठा धक्का बसणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एक तरुण, तडफदार नेतृत्व म्हणजे अभिजीत पाटील. ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मागच्या अर्ध्यातासापासून अभिजीत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरु आहे. दरम्यान फडणवीस यांच्या काल सोलापुरात तीन सभा झाल्या. माढ्यात मोहिते-पाटील कुटुंबाचे राजकीय वजन आहे. तेच भाजपासून दूर गेल्याने इथून उमेदवार निवडून आणणं भाजपासाठी आव्हानात्मक बनलं आहे. आता यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
दरम्यान अभिजीत पाटील ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यावर कारवाई झाली. त्यांची साखरेची गोडाऊन सील करण्यात आली. त्यानंतर माढ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता ते भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान अभिजीत पाटील शरद पवार गटासोबत आहेत. पंढरपुरात त्यांचा राजकीय दबदबा आहे. विधानसभेला त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल असं बोलल जात होतं. ग्रामीण भागातील आश्वासक चेहरा म्हणून अभिजीत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तेच आत भाजपच्या वाटेवर जात असल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे .