X: @Rav2Sachin
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखों अनुयायांना मोफत चहा, पाणी, नाश्ता सोबत जेवणाची आणि मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम बड्या बड्या कंपन्या, सामाजिक संस्था आणि रेल्वे, बेस्ट तसेच पालिका कर्मचारी करत आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी तोट्यात असलेली बेस्ट स्वतः च्या कर्मचाऱ्यांना २० लाख रुपयांची मदत करत हातभार लावत आहे. तर एच. पी. कंपनी १० लाख रुपये आणि इंडीयन ऑईल कंपनी ३ लाख रुपयांची मदत करत आहे. रेल्वे सोबत पालिकेचे ई वॉर्ड आणि अनुज्ञापन खाते मधील आजी माजी कर्मचारी अधिकारी एकत्र येऊन स्व: निधीतून आंबेडकरी अनुयायांना मोफत सेवा पुरवत आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉ. लि. मुंबई रिफायनरी ऑल इंडिया हिंदुस्तान पेट्रोलियम एस. सी., एस. टी. एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन १९८४ पासून 4 ते 6 डिसेंबर असे तीन दिवस 3 लाख आंबेडकरी अनुयायांना मोफत चहा पाणी, बिस्किटे आणि भोजन दान करत आहे. कर्मचारी आणि अधिकऱ्यांच्या स्तुत्य उपक्रमाला एच. पी. कंपनीतर्फे १० लाख रुपयांची मदत केली जाते, असे असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश इंगळे यांनी सांगितले. असेच आंबेडकरी अनुयायांना मोफत वैद्यकीय सेवा, फोटो, पुस्तक वाटप ही केले जात असल्याचे ही इंगळे यांनी सांगितले. सुरुवातीला कर्मचारी आधिकारी यांच्या स्वनिधीतून चैत्यभूमीच्या चौपाटीवर आंबेडकरी अनुयायांना मोफत भोजन दान करण्याच्या उपक्रमाला 1976 पासून सुरूवात झाली होती. पुढे 1990 पासून एच. पी. तर्फे मदत मिळू लागली आणि त्यातून आंबेडकरी अनुयायांना मोफत सेवा सुविधा पुरविल्या जाऊ लागल्या, असे त्यांनी सांगितले.
इंडीयन ऑईल कॉपरेशन लिमिटेड असोशिएशन विथ इंडियन ऑईल रिझर्व्हड कॅटेगरी अँड मायनॉरिटी एम्प्लॉइज असोशिएशनला इंडियन ऑईल तर्फे ३ लाख रुपयांची मदत दिली जाते तर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्वनिधीतून 2 लाखांपर्यंत निधी जमा केली जाते. या जमा झालेल्या रक्कमेतून 2001 पासून आंबेडकरी अनुयायांना मोफत वैद्यकीय सेवा, मोफत चष्मे वाटप आणि भोजन दान दिले जात असल्याची माहिती शामराव कांबळे यांनी दिली. सुरुवातीला सेवा स्तंभ इंडीयन ऑईलच्या माध्यमातून 1985 पासून आंबेडकरी अनुयायांना मोफत भोजन दान करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली होती. त्यावेळी झुणका आणि भाकरी आंबेडकरी अनुयायांना दिले जात होते, असे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट ए. सी. एस.टी. / विजे एन. टी. / एस. बी. सी. एम्पलॉयज वेल्फेअर असोसिएशन तर्फे मागील 17 वर्षापासून आंबेडकरी अनुयायांना मोफत चहा, पाणी, बिस्कीट सोबत वडा, समोसा, चिवडा दिले जाते. सोबत मोफत पुस्तक आणि, चष्मे वाटप केले जाते. तसेच मोफत वैद्यकीय सेवा ही पुरवली जाते, अशी माहिती असोसिएशन अध्यक्ष महेंद्र साळवे यांनी दिली. आज बेस्ट तोट्यात असूनही आमच्या उपक्रमास 20 लाखांची मदत प्रशासनाकडून मिळत असल्याचे साळवे यांनी सांगितले.
मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघ 1986 पासून चेंबूर, पनवेल, एरोली, बेलापूर आदी कित्येक विभागातील लोकांकडून स्वनिधी मधून जमा झालेल्या रक्कमेतून 40 ते 50 हजार आंबेडकरी अनुयायांना मोफत भाजी पाव दिली जाते, असे संघाचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले. आमचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी तीन महिन्यांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतो. जे आमचे नियमित देणगीदार आहे, त्यांना पत्र पाठवून निधी बाबत कळवतो. जमा झालेल्या रक्कमेतून आंबेडकरी अनुयायांना मोफत पाव भाजी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या ई विभागातील अधिकारी व कर्मचारी वृंद तर्फे 2001 पासून 5 आणि 6 डिसेंबर रोजी 50 हजार आंबेडकरी अनुयायांना मोफत कांदे पोहे दिले जाते. ई विभागातील 26 खात्यातील आजी माजी कामगार अधिकारी यांच्या देणगीतून आमचा उपक्रम यशस्वी पार पडतो. केवळ देणगी देऊन आमची लोक गप्प बस्त नाही तर प्रत्यक्ष आंबेडकरी अनुयायांना मोफत सेवा पुरविण्यासाठी ही हातभार लावतात, असे संजय गायकवाड यांनी सांगितले. यावेळीचा उपक्रम हा ई वार्डाचे सहाय्यक आयुक्त सुरेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
ऑल इंडिया एस. सी. एस. टी. रेल्वे एम्प्लॉइज असो. अति. मंडल माटुंगा तर्फे आंबेडकरी अनुयायांना 1991 पासून मोफत कांदे पोहे सोबत भोजन दान दिले जात असल्याचे अध्यक्ष अनिल नाईक यांनी सांगितले. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्वनिधीतून जी रक्कम उभी राहते त्यातून उपक्रमासाठी खर्च केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसात आमच्या असोसिएशन तर्फे 35 हजार आंबेडकरी अनुयायांना भोजन दान आणि 50 हजार आंबेडकरी अनुयायांना कांदे पोहे चे वाटप केले जाते, असे त्यांनी सांगितले.
मागील 9 वर्षे प्रशासनाकडून एक ही पैसा न घेता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्माचारी आणि जवान एकत्र येत स्व निधीतून जमा झालेल्या रक्कमेतून आंबेडकरी अनुयायांना मोफत व्हेज पुलाव, फळ, बिस्कीट आणि पाणी वाटप केले जात असल्याची माहिती सुमेत जाधव यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन खात्यातील आजी माजी कर्मचारी अधिकारी वर्ग स्वतच्या निधीतून मागील 20 वर्षांपासून आंबेडकरी अनुयायांना पाच आणि सहा डिसेंबर रोजी दोन वेळा मोफत भोजन आणि मोफत चहा बिस्कीट देत असल्याची माहिती अनुज्ञापन खात्याचे प्रमुख अनिल काटे यांनी सांगितले. मोफत भोजनाचा लाभ 20 हजार आंबेडकरी अनुयांयी घेतात. तर 12 हजार अनुयायी चहा बिस्कीटाचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
युनियन बँक ऑफ इंडिया एस. सी. / एस. टी. एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन तर्फे 1986 पासून चैत्यभुमी जवळच आंबेडकरी अनुयायांना मोफत पाणी आणि बिस्कीट वाटप केले जात होते. या उपक्रमासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाच रुपये जमा केले जात होते. पुढे 1997 येथे शिवाजी पार्क मध्ये मंडप उभारुन मोफत नाश्ता आणि जेवण देण्यास सुरुवात करण्यात आली. आज आमच्या युनियन बँक तर्फे 7 लाख रुपयांची मदत केली जाते. आम्ही ही स्वनिधीतून 7 लाख रुपये उभे करुन दोन दिवस आंबेडकरी अनुयायांना मोफत उपमा, वडा पाव, पुरी भाजी, बिस्कीट, पाणी आणि व्हेज पुलाव दिला जात आहे. याचा लाभ 70 हजार आंबेडकरी अनुयायी घेत असल्याचे हरीश तायडे यांनी सांगितले. आता दरवर्षी आमच्या उपक्रमातून चैत्यभूमीला काहीनाकाही भेट वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. चैत्यभूमीला मखमली कार्पेट, भंते निवासामध्ये फ्रिज, बेडीची सुविधा सोबत फर्निचर आणि 4 वातानुकूलित यंत्रणा भेट म्हणून दिल्याचे तायडे यांनी सांगितले.
इन्कम टॅक्स एस. सी. एस. टी. ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन मुंबई तर्फे आंबेडकरी अनुयायांना मोफत पाणी वाटप केले जात असल्याचे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एल. ए. जनबंधू यांनी सांगितले.