X: @abhaykumar_d
नांदेड: महाराष्ट्रातील सत्ताधार्यांना मराठवाड्यातून यापूर्वी बराच त्रास झालेला आहे . मराठवाड्यातील भोळ्याभाबड्या जनतेला कधी जातीयवाद, कधी आरक्षण ,कधी शेतीविषयक समस्या या कारणावरून भडकावले जाते. नेतेमंडळी बाजूला राहतात. परंतु समाजात दरी निर्माण होईल असे कृत्य करून संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम नियोजनबद्धरीत्या केले जाते. यापूर्वी मराठवाड्यातून अनेकदा असे कुकृत्य झालेले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यामुळे पुन्हा मराठवाड्यातूनच त्यांच्यावर राजकीय जाळे फेकण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात त्यामुळे यापूर्वी मराठवाड्यातून पेटविलेल्या विविध आंदोलनाच्या मुस्क्या त्यांनी आवळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडला. महाविकास घडविण्यासाठी जनतेने महायुतीला निवडून दिले. या निवडीनंतर मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपकडे मुख्यमंत्री पद जाऊ नये या दृष्टीने दुधात मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न झाले. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची वर्णी लागू नये या दृष्टीनेही राजकीय चर्चा घडविण्यात आल्या. अखेर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे आणि अजित आशाबाई अनंतराव पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एकदाचा हा सोपस्कार व्यवस्थितरित्या पार पडला. त्यानंतर मात्र आता या तिघांनाही राज्याचा कारभार जनतेच्या अपेक्षेप्रमाणे सांभाळावा लागणार आहे. सत्ता म्हणावी तेवढी सोपी नसते, यापुढे नव्या सरकारला नवी आव्हाने पेलावी लागणार आहेत. अगोदरच एकनाथ शिंदे यांची असलेली थोडीबहूत नाराजी व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांचा केलेला स्वीकार राज्याला सर्व काही सांगून जाते. दुसरीकडे अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदासाठीची असलेली संमती, दिल्लीश्वरांची घेतलेली भेट, चेहर्यावरून देह, बोलीभाषा समाधानकारक वाटली. हा सर्व सुरुवातीचा चांगला काळ वाटत असला तरी, मुख्यमंत्री देवेंद्र यांना भरपूर काही करावे लागणार आहे.
मराठवाड्यात सोयाबीन, कापूस व अन्य पिकांना योग्य हमीभाव न मिळाल्याने त्यांना शेतकर्यांची विस्कटलेली घडी निट बसवावी लागणार आहे. याबरोबरच मराठवाड्यात युवकांची मोठ्या प्रमाणात वाढलेली बेरोजगारी याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मराठवाड्यात विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात दबक्या आवाजात करत असलेल्या चर्चांना अधूनमधून धुमसत ठेवणारच आहे. या व अशा घटनांना सामोरे जातांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वेगळी परीक्षा असणार आहे.
मराठवाड्यात यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत दिलेला शब्द लक्षात ठेवावा लागणार आहे. परंतु यामधून ओबीसी समाजबांधवांची नाराजी न होता मार्ग काढावा लागणार आहे. येणारा काळ सोपा नाही . ऊस उत्पादक शेतकर्यांच्या समस्या, लाडकी बहिण योजना विना अडथळ्याची सुरू ठेवणे अशा अनेक आव्हानांना नव्या सरकारला सामोरे जावे लागणार आहे. अडीच वर्षांपूर्वी मनाचा मोठेपणा व राजकीय त्याग करून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मोलाची राजकीय साथ दिली. ठाणे जिल्ह्यापूरती एक वेगळी छबी असलेल्या एकनाथ शिंदे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ करून त्यांना दिलेली साथ आयुष्यभर विसरता येणार नाही, हे ज्यांनी जाणले त्यांनी नक्कीच भाजपला देखील ओळखले असेल. मराठवाडयात बेरोजगारीची समस्या अधूनमधून तोंड वर काढत असते. मराठवाड्यात उद्योगाचे जाळे मोठ्या तिव्रतेने विणन्याची गरज आहे. या सर्व बाबी सांभाळत असताना महाराष्ट्रात कारभार करणे म्हणजे केवळ तारेवरची कसरत नसून जीव धोक्यात घालून वाहन चालविण्यासारखे आहे. याकडे लक्ष देत – देत सत्तेत त्रिदेवांचा ताळमेळ असणे अत्यंत गरजेचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मराठवाड्यात महायुतीच्या माध्यमातून महाविकास करावयाचा आहे. त्यामुळे तिघांना योग्य ताळमेळ बसवत राज्याचा कारभार निट नेटका, स्वच्छ, पारदर्शी करावयाचा आहे. मराठवाड्यात भ्रष्टाचारमुक्त शासकीय यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे.
मराठवाड्याचा विचार करताना आता यापुढे कोणत्या पक्षाला कोणते मंत्रीपद यावरही मराठवाड्याच्या विकासाची नांदी अवलंबून आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या सर्व अपेक्षांना ते पूर्ण करतील अशी आस आपण सर्वजण करूया. परंतू यासाठी त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील सर्वांची साथ गरजेची आहे. शेवटी राज्यात व दिल्लीत भाजपाची सत्ता असल्यामुळे महाराष्ट्रात केंद्राकडून विकासासाठी भरघोस निधी मिळेल, यात शंका नसावी. व त्यामधून मराठवाड्यालाही भरभरून निधी मिळेल. महाराष्ट्रात काय हवे आहे, काय नको याची पूर्ण कल्पना दिल्लीतील वरिष्ठांना देखील आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याला काय द्यायचे आहे व काय गरजेचे आहे, हे या तिन्ही नेत्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. पूर्वीचा उत्तरप्रदेश व दिल्लीची साथ मिळाल्यानंतर झपाट्याने कायापालट होत असलेल्या युपीची सद्यस्थिती खूप काही सांगून जाते. महाराष्ट्रातही भविष्यात अशीच विकासाची गंगा वाहणार आहे, असा विश्वास भाजपाकडून महाराष्ट्रातील जनतेला दिला जात आहे. शेवटी कुणाबद्दल आकस न बाळगता न्यायपूर्ण कारभार करण्याची ग्वाही या तिन्ही नेत्यांनी दिलेली आहे. राज्यकर्त्यांकडून जनतेला आस आहे. नव्या सरकारचे अभिनंदन करून मराठवाड्यातील वंचित लोकांच्या उत्कर्षासाठी या त्रिदेवांनी यथायोग्य कारभार करावा, अशी पुन्हा एकदा शुभेच्छा .
राजकारणात दोन प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. एक उचापती करणारा तर दुसरा पूरून उरणारा. मराठवाड्यात अनेक राजकारणी उचापती करतात . परंतु त्यांना पुरून उरणारा कधी ना कधी भेटतोच. योगायोगाने महाराष्ट्राला राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून लाभलेले आहेत. त्यांना कोणाला कधी कसे वागवावे याचे पूर्ण ज्ञान आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ‘पुरून उरणारा नेता’ असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील इतिहास पाहता भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नये, म्हणून त्यांनी आत्ताच उचापतीखोर राजकारण्यांवर अंकुश लावत त्यांना पुरून उरावे, अशी अपेक्षा मराठवाड्यातील सुजाण जनता करत आहे.
(लेखक डॉ. अभयकुमार दांडगे हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्याशी abhaydandage@gmail.com या ईमेल द्वारे किंवा 9422172552 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.)