मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना यंदाचा मरणोत्तर मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, बहुभाषिक गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार 2024 मिळणार आहे. हे पुरस्कार 24 डिसेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान केले जातील, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आणि मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
मजरूह सुलतानपुरी यांचा पुरस्कार त्यांचे चिरंजीव अंदलिब मजरूह सुलतानपुरी स्वीकारणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन स्पंदन संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात आले आहे.
पुरस्काराचे स्वरूप –
• मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार: रु. 1 लाख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ
• मोहम्मद रफी पुरस्कार: रु. 51 हजार, स्मृतिचिन्ह
पुरस्कार सोहळ्याबाबत –
कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार असून ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण “फिर रफी” या मैफिलीत मोहम्मद रफींची अमर गाणी सादर करतील. कार्यक्रमाचे निवेदन रेडिओ जॉकी गौरव करतील. कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका ॲड. आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये संगीतकार आनंदजी, आशा भोसले, सोनू निगम, अमिन सयानी यांसारख्या नामवंतांचा समावेश आहे. यंदा गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि गायक जावेद अली यांना पुरस्कार जाहीर करताना विशेष आनंद होत असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.