नागपूर :- शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कुणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एखादे पद मिळाले नाही तर माणूस म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे, काहीजणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या, मात्र याचा अर्थ कुणी नाराज आहे असे नाही. आज नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार माझ्या सोबत असून त्यांच्यापैकी कुणीही नाराज नाही. यापुढेही सगळेजण मिळून शिवसेनेमध्ये एकत्र राहून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे काही आमदार नाराज झाले होते. विजयबापू शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वे यांनी यानंतर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या तिघांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना, सरकार म्हणून काम करताना काही वेळा पदे येतात आणि जातात, मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते महत्वाचे आहे. जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद वाटते त्याचप्रमाणे विजयबापू शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी हे पद महत्वाचे आहे असे त्यांनी मला सांगितले. आम्ही सारे शिवसेना नावाच्या कुटूंबाचा भाग असून या परिवारापासून कुणीही वेगळे होणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आज इथे नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार उपस्थित असून यापुढेही ते पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करतील असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
कल्याणमधील घटनेत शिवसेना मराठी कुटूंबाच्या पाठीशी
कल्याणमधील सोसायटीत मराठी कुटूंबासोबत घडलेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटूंबाच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणी कसे रहावे आणि काय खावे यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही तसे करणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कुणी शिवीगाळ करून मराठी कुटूंबावर हल्ला केला तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही असे शिंदे यांनी निक्षून सांगितले.
बीड येथील घटनेत कुणालाही पाठीशी घालणार नाही.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ही अत्यंत अमानुष असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत आज सभागृहात विस्तृतपणे आपले म्हणणे मांडले आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असून तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेतील पीडित कुटूंबाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. या प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला आणि कुणाच्याही जवळचा असला तरीही त्यांना पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.