धुळे : विना परवाना भारतात घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून ही कारवाई शहरातील न्यू शेरेपंजाब लॉज येथे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
वैध कागदपत्रांशिवाय भारतात घुसखोरी
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, न्यू शेरेपंजाब लॉजच्या खोली क्रमांक १२२ मध्ये चार व्यक्ती वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ डिसेंबर रोजी पथकासह लॉजवर छापा टाकला.
अटक केलेले संशयित
अटक करण्यात आलेले चारही जण बांगलादेशचे रहिवासी आहेत :
• महंमद मेहताब बिलाल शेया (वय ४८ वर्षे)
• शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (वय ४३ वर्षे)
• ब्यूटी बेगम पोलस शेख (वय ४५ वर्षे)
• रिपा रफीक शेख (वय ३० वर्षे)
या चौघांनी भारतात वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय प्रवेश केल्याचे समोर आले आहे. महंमद शेख आणि शिल्पी बेगम हे पती-पत्नी असून, त्यांच्यासोबतच्या महिलांना त्या त्याच्या बहिणी असल्याचे सांगण्यात आले.
बेरोजगारीमुळे भारतात प्रवेश
प्राथमिक चौकशीत त्यांनी बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. येथेच कायम वास्तव्य करण्यासाठी ते घराचा शोध घेत होते. त्यांच्या ताब्यातून ४० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल हँडसेट पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच, ते नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आयएमओ (IMO) या अॅपचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल आणि पुढील कारवाई
या प्रकरणी प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी
या कारवाईत श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील, मुकेश पवार, शशिकांत देवरे, हेमंत पाटील, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, निलेश पोतदार, विनायक खैरनार, किशोर पाटील, रफीक पठाण तसेच दामिनी पथकाच्या धनश्री मोरे, आझादनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील, बेबी मोरे आणि वंदना कासवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
न्यायालयात हजर
संशयितांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांची पोलीस कोठडी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.