छत्रपती संभाजीनगर: चेलीपुरा भागातील महावीर घरसंसार या तीन मजली इमारतीला रात्री उशिरा भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेजारील दुकाने आणि घरे देखील आगीच्या झळांना सामोरे गेली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंत्री अतुल सावे यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पंचनामे करण्याचे आणि तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेचा तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आगीच्या मोठ्या लोटांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठी हानी टळली.
आगीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन मंत्री सावे यांनी केले आहे.