पुणे: कर्तुत्व आणि श्रीमंती फक्त भौतिक सुख संपत्ती मध्ये नसून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिकवून त्यांना करिअरच्या टप्प्यावर स्थिरस्थावर करणारे, तसेच आजही
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजसेवेचे अविरत कार्य करणाऱ्या टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर रहिवाशी आशा आणि श्रावण गायकवाड यांना सुसंगत फौंडेशन, पुणे यांच्याकडून आदर्श माता-पिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील मूळ रहिवासी असलेले श्रावण आणि आशा गायकवाड यांनी आपल्या मुलांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण दिले.
थोरले डॉ. गिरीश गायकवाड सध्या नेरळ जि. रायगड येथे राहतात. शेजारच्याच आदिवासीबहुल कळंब गावात ते वैद्यकीय पूर्णवेळ सेवा देतात. वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांनी एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले असून ते शक्य त्या ठिकाणी सामाजिक सेवेमध्ये झोकून देतात. त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा गायकवाड नेरळ या ठिकाणी यशस्वी डेंटल क्लिनिक चालवतात. या दांपत्यांना श्रेया नावाची एकमेव मुलगी असून ती सध्या दहावीचे शिक्षण घेते.
दोन नंबरचे विजय यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण पूर्ण करून कृषी पत्रकारितेमध्ये करिअर निवडले. बीएससी ॲग्रीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी कृषी पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन दैनिकाचे मंत्रालय प्रतिनिधी म्हणून त्यांनी तब्बल तेरा वर्षे काम केले. त्यानंतर ईटीवी भारत आणि मॅक्स महाराष्ट्र सोबत पत्रकारिता करून सध्या ते मुंबईमध्ये मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांच्या पत्नी आश्लेषा या फार्मसी ग्रॅज्युएट असून एमबीए झाल्या आहेत एका जगप्रसिद्ध आर्ट फर्म साठी रिसोर्स पर्सन म्हणून त्या मुंबईत कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा आरव (12) हा मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शिकत असून चांगला हॉकीपटू आहे.
तिसरे बंधू डॉ. सतीश गायकवाड यांनी शिरवळच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयात Bvsc चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण (Mvsc) आणि पीएचडी भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्था (IVRI) येथून पूर्ण केले. पोस्ट-डॉक्टरेट साठी त्यांनी दक्षिण कोरियातून पूर्ण करून तिथेच दीर्घकाळ पशुवैद्यकीय संशोधन केले. डॉ. सतीश यांच्या पत्नी डॉ. उषाराणी गायकवाड यांनीही पशुवैद्यकीय क्षेत्रात पीएचडीचे शिक्षण केले असून दोघांनी दीर्घकाळ दक्षिण कोरिया मध्ये संशोधनाचे एकत्र काम केले. डॉ. सतीश यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयात बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक पदाची जबाबदारी देखील सांभाळली. तीन वर्षाच्या सेवेनंतर डॉ. सतीश यांनी पुण्यामधील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ( ICMR) मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी स्वीकारली. डॉ. सतीश आणि डॉ. उषाराणी यांना सेजल नावाची मुलगी असून हे सर्व सध्या पुण्यामध्ये वास्तव्य करतात. कन्या प्रज्ञा पनवेल या ठिकाणी फार्मसी व्यवसायात कार्यरत असून तिला सम्यक नावाचा मुलगा आहे.
आई-वडील श्रावण आणि आशा गायकवाड यांनी एवढ्या संघर्षातही समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे. स्वतःची मुलं शिकली सवरली स्थिर सावर झाली परंतु आजूबाजूला गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ते जातीने लक्ष घालतात स्कॉलरशिप असो की प्रवेश प्रक्रिया सर्व मार्गदर्शन आणि शक्य त्या ठिकाणी आर्थिक मदत देखील करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा.. हा मंत्र तंतोतंत गायकवाड कुटुंबाने आयुष्यात प्रत्यक्षात आणला आहे. त्यामुळे कुठेही अन्याय आणि अत्याचार होत असेल तर गायकवाड कुटुंबातला कुठलाच सदस्य स्वस्थ बसू शकत नाही.
एवढेच काही थोर समाजसेवकाच्या छत्रछाये खाली वाढलेल्या सैनिक सहकारी बँकेने पारनेरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा गिळंकृत करणे कामी प्रस्थापितांसमोर दिलेला लढा काळे ध्वज दाखवून आपला लढाऊ बाणा दाखवून दिला आणि अतिक्रमण रोखले. गावातील दलित वस्ती सुधारणेच्या नावाखाली प्रस्थापित राजकारण्यांनी लुटलेल्या निधीची पोलखोल देखील श्रावण गायकवाड यांनी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून चव्हाट्यावर मांडली आहे.
एवढा संघर्ष सुरू असताना धम्माचा मार्ग सोडला नाही. आयुष्यातील मोठा टप्पा बौद्धाचार्य म्हणून मुंबई पुणे आणि अहमदनगर परिसरामध्ये हजारो लग्नविधी लावून दिले. बौद्ध हितवर्धक संस्था पारनेर, बौद्धजन पंचायत आणि भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून शक्य तेवढे योगदान आईनांनी दिले आहे.
आमच्या विनंतीला मान देऊन, आपल्या नावाची शिफारस, आमच्या कार्यकर्त्यांनी आपला आदर्श माता-पिता म्हणून सत्कार व्हावा म्हणून केली आहे. आमच्या विश्वस्त मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. आमचे भाग्य की आमच्या संस्थेस आपला सत्कार करण्याची संधी मिळत आहे. तरी सत्कार स्वीकारून आम्हास उपकृत करावे, असे निवेदन सुसंगत फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर भ. न्हाळदे यांनी केले आहे. आदर्श माता पिता पुरस्कार वितरण 25 जानेवारी 2025 रोजी पुण्यामध्ये होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, उत्तम वक्ते, लेखक व समिक्षक असणार आहेत तरकार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विवेक सावंत,मुख्यमार्गदर्शक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL). लेखक, विचारवंत. अध्यक्ष-साधना ट्रस्ट, विश्वस्त, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आहेत
कार्यक्रमाचे स्थळ : एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे-४११०३०
दिनांक व वेळ : शनिवार, दि. २५ जानेवारी २०२५ सकाळी ९.३० वा.
या पुरस्काराबद्दल गायकवाड दापत्याचे पंचक्रोशी आणि परिसरांमधून अभिनंदन होत आहे.