• एमआयटी एडीटी विद्यापीठात रंगणार राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा थरार
• क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंसह अंजली भागवत, सचिन खिलारे यांच्या उपस्थितीत उद्घाटन
पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यंदा ७व्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२५) साठी सज्ज झाले आहे. हा राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव २४ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान विद्यापीठाच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलात होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २४ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली होईल. विशेष पाहुणे म्हणून नेमबाज व अर्जुन पुरस्कार प्राप्त अंजली भागवत आणि पॅरा अँथलेटिक्समध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्यपदक विजेते सचिन खिलारे उपस्थित राहतील.
स्पर्धेतील प्रमुख खेळ
या स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, कबड्डी, टेनिस, खो-खो, वॉटर पोलो, स्विमिंग, बॉक्सिंग, रोइंग, नेमबाजी, बुद्धीबळ यांसारख्या १५ हून अधिक क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. विजेत्यांना एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
मुख्य आकर्षणे
• समारोप व बक्षीस समारंभ: २९ जानेवारी रोजी आमदार ज्ञानेश्वर कटके आणि ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत.
• खेळाडूंची संख्या: यंदा १३५ हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
उद्दिष्ट
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडवणे हा आहे.
आवाहन
स्पर्धेसाठी नावनोंदणी अद्याप सुरू आहे. राज्यभरातील खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांनी केले आहे.
‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित या क्रीडा महोत्सवात विद्यापीठाचे संपूर्ण वातावरण क्रीडामय होणार असल्याचे प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे यांनी सांगितले.