इंदापूर : राज्यातील सरकारने 400 कोटी रुपयांच्या पीक विमा घोटाळ्याची कबुली दिली असून, त्याच सरकारमधील आमदार हा घोटाळा 5000 कोटी रुपयांचा असल्याचा दावा करत आहेत. हा गंभीर विषय असून, तो संसदेत मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे सांगितले.
सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय आणि त्याची कबुली राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्रीच देत आहेत. मग चौकशी का केली जात नाही? हा विषय मी संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.”
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना सुळे म्हणाल्या, “लोकांची भावना आहे की, महाराष्ट्रात वर्दीची भीतीच राहिली नाही. सरकार स्थापन होऊन 60 दिवस झाले तरी कोणतेही ठोस काम झालेले नाही.”
निधीअभावी निरा-भीमा नदी जोड प्रकल्प ठप्प असून, शेतकऱ्यांसाठी वीज डीपी बसवण्यासाठीही निधी मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “सरकारने इंदापूरवर अन्याय केला असून पालकमंत्रीपदही दिले नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
सुळे म्हणाल्या की, निवडणुकांबाबत लोकांमध्ये अस्वस्थता आहे. “लोक बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. जर लोकांची मागणी असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात काय अडचण आहे?” असा सवाल त्यांनी केला.
राज्यात सातत्याने हिंसक घटनांवर चर्चेची मागणी करताना त्यांनी बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एनकाउंटरबाबत न्यायालयाने पोलिसांना दोषी ठरवल्याचे उदाहरण दिले. “जेल ऑफ चॉईस ही नवीन स्कीम सरकारने काढली आहे, ही परिस्थिती चिंताजनक आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
“सरकारकडे मोठा जनाधार असूनही सामान्य लोक फसवल्याची भावना का आहे?” असा सवाल उपस्थित करत सुळे यांनी सरकारला जबाबदार धरण्याची मागणी केली.