मुंबई – मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दोनच दिवसांपूर्वी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ₹७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेश प्रवक्ते तथा मुंबई युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. “हाती नाही सत्ता, पण खर्चाला उधळपट्टी”, अशा शब्दांत त्यांनी या अर्थसंकल्पावर कडाडून टीका करत सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले.
अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ
मुंबई महानगरपालिका सध्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींविना प्रशासकीय ताब्यात आहे. अशा परिस्थितीत ₹७४,४२७ कोटींच्या प्रचंड मोठ्या अर्थसंकल्पाची घोषणा करणे हे मुंबईच्या विकासापेक्षा भाजपच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग वाटतो, असा आरोप ॲड. मातेले यांनी केला.
“महापालिकेवर लोकशाही नाही, प्रशासकीय राजवट आहे. या स्थितीचा गैरफायदा घेत भाजपने आपल्या सोयीचे प्रकल्प मंजूर करून वाट्टेल तसे खर्च मांडले आहेत. मुंबईकरांच्या गरजा, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा आणि जनतेच्या मतांचा विचार न करता घेतलेले हे निर्णय म्हणजे – ‘एकहाती सत्ता, मनमानी खर्चाची परवानगी’!” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
भ्रष्टाचाराचा अखंड स्त्रोत!
“भ्रष्टाचाराचा अखंड स्त्रोत असलेल्या भाजपच्या कारभारात हा अर्थसंकल्प म्हणजे ‘अंधारात कंदिल विकण्याचा उद्योग’!” अशी घणाघाती टीका करत त्यांनी पुढील मुद्दे उपस्थित केले –
• गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील विकासकामे रखडली आहेत, पण जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जात आहे.
• रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, घनकचरा व्यवस्थापनातील अपयश, सार्वजनिक आरोग्य सेवांचे हाल यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
• मुंबईकरांसाठी मूलभूत सुविधा नाहीत, पण कंत्राटदार आणि दलालांना बिनधास्त सवलती दिल्या जात आहेत.
• एकाच कंत्राटदारांना वारंवार कामे दिली जात आहेत. यामागे कोणाचा आर्थिक स्वार्थ आहे?
अर्थसंकल्पाची सूत्रे दिल्लीतून हलवली जाताहेत का?
“आयुक्त म्हणजे फक्त सरकारी निमित्त, पण अर्थसंकल्पाची सूत्रे दिल्लीतूनच हलवली जात आहेत का?” असा सवाल करत ॲड. मातेले यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला.
मुंबईकरांवर नवे कर, पण सत्ताधाऱ्यांना श्रेय?
मुंबई महानगरपालिकेकडे हजारो कोटींची शिल्लक रक्कम असतानाही मुंबईकरांवर नवे कर लादायचे आणि विकासकामांचे श्रेय मात्र भाजपने घ्यायचे, हा डाव फसवणुकीचा आहे, असा आरोप त्यांनी केला.
“जनता मूर्ख नाही. भाजप सरकार मुंबईकरांच्या पैशाचा गैरवापर करत असेल, तर त्याचा हिशोब लावल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर हा पैसा ‘ईडी-मनी टू इलेक्शन फंड’ होणार नाही, याची खबरदारी घेणं आवश्यक आहे!” असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईकरांचा पैसा, दिल्लीकरांची सत्ता?
“मुंबईकरांच्या पैशावर दिल्लीत सत्ता माजवणाऱ्यांचा हिशोब लागणारच!” असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसने हा अर्थसंकल्प भ्रष्टाचाराचे गालबोट असलेला, लोकशाहीविरोधी आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप केला.