By Yogesh Trivedi
मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणारे, तसेच संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आणि रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक गोपालदास मावजी पुरेचा यांचा स्वातंत्र्यलढ्यातील उल्लेखनीय सहभाग केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती पोर्टलवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील गोपालदास मावजी पुरेचा यांचे योगदान
गोपालदास मावजी पुरेचा यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1914 रोजी मांडवी, कच्छ (आताचा गुजरात) येथे झाला. श्रीमंत व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या गोपालदास यांना ‘काकूभाई भाटिया’ या टोपणनावाने ओळखले जायचे. त्यांनी साने गुरुजींच्या अनुयायी गुणवंतीबाई यांच्याशी विवाह केला होता.
महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 1932 मध्ये त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत प्रवेश केला. 1942 मध्ये ‘भारत छोडो आंदोलन’ दरम्यान डॉ. अमोल देसाई यांच्यासोबत पुण्यातील लष्करी छावणीवर हल्ला करण्याच्या कटात ते सहभागी झाले होते. मात्र, एका स्थानिकाने विश्वासघात केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
येरवडा तुरुंगात 14 महिने गांधीजींसोबत घालवल्यानंतर, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत कारवाया सुरूच ठेवल्या. गांधीजींनी त्यांची ओळख लपवण्यासाठी त्यांना “मानवेंद्रनाथ आझाद” हे टोपणनाव दिले होते.
स्वातंत्र्यानंतरही सामाजिक कार्याला वाहून घेत, त्यांनी दहिसर परिसरात पाणी व दूध वितरण व्यवस्थापन, तसेच ‘मफतलाल मिल’मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळला. ते ‘श्री सदगुरू सेवा संघ ट्रस्ट’चे अध्यक्षही होते.
पेन्शन नाकारून निःस्वार्थ सेवेची जपली परंपरा
महाराष्ट्र सरकारने त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता दिली, मात्र त्यांनी पेन्शन घेण्यास नकार दिला. 29 जुलै 1982 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ पोर्टलवर त्यांच्या कार्याची अधिकृत नोंद झाल्याने दहिसर, बोरिवली आणि मुंबईतील समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.