मुंबई : राज्यातील विकासकामांची गती वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यास खर्च वाढतो आणि राज्याच्या आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे नियोजित वेळेतच प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच, पुण्यात एम्स उभारणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात प्रकल्प सनियंत्रण कक्ष (Project Monitoring Unit – PMU) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय सचिव, जिल्हाधिकारी, तसेच विविध महामंडळ व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश
बैठकीत पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. “पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे रिंग रोड, मेट्रो, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम जलद पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा,” असे अजित पवार म्हणाले.
तसेच, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ‘कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर’ मार्गाच्या व्यवहार्यता अहवालाची तपासणी करून तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा
बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांची प्रगती पाहणी केली. यामध्ये,
• पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्प
• लोणावळ्यातील नियोजित स्कायवॉक आणि टायगर पॉईंट पर्यटन विकास प्रकल्प
• सारथी संस्थेची नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर आणि अमरावतीमधील विभागीय केंद्रे
• सातारा वैद्यकीय महाविद्यालय आणि अलिबागच्या उसर येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
• सातारा सैनिक स्कूल प्रकल्प
• रेवास-रेड्डी सागरी महामार्ग आणि मिरकरवाडा (रत्नागिरी) बंदर प्रकल्प
• पुण्यातील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक आणि वढू-तळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक
प्रकल्प पूर्णतेसाठी विभागीय समन्वयाचे निर्देश
बैठकीत उपस्थित सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा दिला. उपमुख्यमंत्र्यांनी प्रकल्पांसाठी निधी, अंमलबजावणीतील अडचणी आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करत, सर्व प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.