मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, येथे पूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी थेट आर्थिक पायाभूत व्यवस्थेवर घाला घातला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमधील सुसूत्रता आणि सायबर तसेच गुप्तचर समन्वय अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यात स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे भारत-पाकिस्तानदरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘नागरिक–सैन्य समन्वय बैठक’ घेण्यात आली. या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, संवेदनशील ठिकाणी सुरक्षेची पुनर्रचना आणि सतर्कतेची उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय लष्कराने अलीकडेच पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईचे विशेष उल्लेख करून, “ही अचूक आणि प्रभावी कामगिरी अभूतपूर्व असून, मी संपूर्ण महाराष्ट्रातर्फे संरक्षण दलाला सलाम करतो,” असे गौरवोद्गार काढले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लष्करातर्फे लेफ्टनंट जनरल आणि कर्नल, नौदलाचे रिअर अॅडमिरल आणि कमांडर, वायुदलाचे एअर वाईस मार्शल, तसेच राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई व नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस, होमगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी निर्देश दिले की, राज्य आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणांमध्ये नियमित संवाद, माहितीचा आदानप्रदान, तसेच सामूहिक सुरक्षा कवच रचनेसाठी एकात्मिक आणि गतिशील यंत्रणा निर्माण केली जावी.