मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारतीय लष्कराच्या शौर्याविषयी संशय निर्माण करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केली.
“भारतीय लष्कराच्या कारवाईवर अविश्वास व्यक्त करणाऱ्या राऊत आणि सावंत यांची वक्तव्ये म्हणजे पाकिस्तानची भाषा असून, ते पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते झाले आहेत,” अशी तीव्र टीका खा. म्हस्के यांनी केली.
खा. म्हस्के यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या ‘गिरे तो भी टांग उपर’ या विधानावरून जोरदार हल्ला चढवत म्हटले की, “भारतीय हवाई दलाचे वैमानिक अत्यंत दक्ष असून, त्यांच्यावर अशा प्रकारची उपहासात्मक टीका करणे हा त्यांचा अपमान आहे.” सावंत यांनी या वक्तव्यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
१९७१ साली भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा संदर्भ देत खा. म्हस्के म्हणाले, “त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या विरोधी नेत्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. आज मात्र विरोधक सरकारपेक्षा पाकिस्तानच्या वृत्तपत्रांवर अधिक विश्वास ठेवताना दिसत आहेत.”
संजय राऊत यांच्यावर टीका करताना खा. म्हस्के म्हणाले, “आज राऊत यांची वक्तव्ये ऐकता त्यांना पाकिस्तानच्या वृत्तपत्राचे संपादकत्व किंवा प्रवक्तेपद हवे आहे असे वाटते. जर त्यांना भारतीय लष्करावर विश्वास नसेल, तर त्यांनी आता रावळपिंडी किंवा लाहोरमधून निवडणूक लढवावी!”
तसेच, २००६ मधील लोकल स्फोट आणि २००८ च्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी राऊत यांना इंदिरा गांधींची आठवण झाली नव्हती, त्यावेळी सर्जिकल स्ट्राइकची मागणी का केली गेली नाही? असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला.
खा. म्हस्के म्हणाले, “भारतीय लष्कर हे कोणत्याही पक्षाचे नव्हे, तर देशाचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणे म्हणजे थेट देशद्रोह आहे.” लष्कराने फोटो, व्हिडिओ यांसह पुरावे दिल्यानंतरही जर खासदार त्यांच्यावर अविश्वास दाखवत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.