मुंबई – “जातीनिहाय जनगणना झाली, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते,” असा ठाम दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. टिळक भवन येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत, जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली.
“जातीनिहाय जनगणना ही केवळ आकडेवारी नव्हे, तर सामाजिक न्यायाचा पाया आहे,” असे सांगत त्यांनी म्हटले की, “राहुल गांधी यांनी ‘ज्यांची संख्या तेवढी भागीदारी’ हा विचार मांडून देशात एक सामाजिक परिवर्तनाचा अजेंडा राबवला आहे. ओबीसी, मराठा, पाटीदार, धनगर आणि गुर्जर यांसारख्या अनेक मागास घटकांचा आरक्षणाचा प्रश्न याच माध्यमातून सुटू शकतो.”
सपकाळ म्हणाले, “राज्यात जर जातनिहाय जनगणना झाली, तर ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण ६४ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे सरकारने तातडीने प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पाडावी.”