महाड : महाड-दापोली मार्गावर अवकाळी पावसामुळे २४ तासाच्या आत सलग दोन अपघात झाल्याने महामार्गावरील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही अपघातांमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी आगामी पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी दिला आहे.
शनिवारी दुपारी स्वारगेट एसटी डेपोची विन्हेरे-स्वारगेट ही बस करंजाडी-बुद्धवाडी परिसरात अपघातग्रस्त झाली. या बसमधील १५ प्रवाशांपैकी ७ प्रवासी तसेच चालक व वाहक जखमी झाले होते. या घटनेला २४ तासही लोटले नसताना, शिरगावजवळील गोमंत हॉटेलजवळ लग्न समारंभावरून परतणारी MH-08-AX-1542 क्रमांकाची इको कार रस्त्यावरून घसरून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
त्याचप्रमाणे, रेवताळे-आंग्रे-कोंड परिसरात टाटा कंपनीचा मालवाहतूक टेम्पो (MH-06-7853), जो तुढील येथील आरिफ देशमुख यांचा आहे, तोदेखील रस्त्यावरून घसरून अपघातग्रस्त झाला. या अपघातातही जीवितहानी झाली नसली, तरी या सर्व घटनांमुळे महामार्गाच्या डांबरीकरणाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शिरगाव फाटा ते लाटवण फाटा दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत निसरडा आणि धोकादायक बनला आहे. डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या आधीच अपघात होत असताना, पावसात परिस्थिती किती गंभीर होईल, याचा विचारही करता येत नाही.
“अशा निकृष्ट कामांसाठी जबाबदार कोण? अपघातानंतर जबाबदारी कुणी घेणार?” – असा सवाल सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना थेट विचारला आहे.
ओझर्डे यांनी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची गुणवत्ता तपासावी आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.