मुंबई : मुंबईच्या विकासात आणि सामाजिक सुधारणांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच्या नावाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही मागणी समस्त मुंबईकरांच्या वतीने करण्यात आली आहे.
नाना शंकर शेठ हे समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. देशातील पहिल्या रेल्वे प्रकल्पात—१८ एप्रिल १८५३ रोजी सुरू झालेल्या बोरीबंदर ते ठाणे रेल्वे मार्गात—ग्रेट पेनिनसुला रेल्वे कंपनीचे ते संस्थापक सदस्य होते. कंपनीच्या दोन भारतीय संचालकांमध्ये जमशेदजी जीजीभाय यांच्यासह नाना शंकर शेठ यांचा समावेश होता.
रेल्वे प्रकल्पासाठी त्यांनी निधी, जमीन आणि सर्वतोपरी मदत दिली. रेल्वेची संकल्पना सर्वप्रथम त्यांच्या मनात आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. आजची मुंबई लोकल ही जीवनवाहिनी ठरली आहे आणि नाना शंकर शेठ हे तिचे जनक मानले जातात.
त्यांचे योगदान केवळ रेल्वेपूरते मर्यादित नव्हते. ते मुंबईतील एशियाटिक लायब्ररीचे संस्थापक आणि विधान परिषदेचे पहिले भारतीय सदस्य होते. त्यांनी मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, लॉ कॉलेज, तसेच मुंबईतील पहिले महिला महाविद्यालय उभारण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या सर्व कार्यांचा सन्मान म्हणून मुंबई सेंट्रल स्थानकाला “जगन्नाथ (नाना) शंकर शेठ” यांचे नाव देणे उचित ठरेल. यामुळे देशातील नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, असे वायकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
रेल्वे मंत्रींचे सकारात्मक आश्वासन
या मागणीवर उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई दौऱ्यात संबंधित शिष्टमंडळाची भेट घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.