मुंबई : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी आमदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज, २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या डाव्या चळवळीतील एक झुंजार, संघर्षशील आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व हरपले आहे.
कॉम्रेड लहानू कोम १९५९ पासून माकपशी कार्यरत होते. पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, आणि आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे १९६२ पासून अध्यक्षपद त्यांनी भूषवले. गेली सहा दशके त्यांनी लाखो आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत नेतृत्व केले.
ते गेल्या १० दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, कन्या सुनंदा, नातवंडे तुषार, विजय, रुचिता आणि इतर कुटुंबीय आहेत.
कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा गुरुवार, २९ मे रोजी दुपारी १२ वाजता पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी परुळेकर भवन येथून निघणार आहे. माकपचे वरिष्ठ नेते, महाविकास आघाडीचे नेते आणि हजारो कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत.