मुंबई – राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, आणि शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातील प्राधान्यक्रम यावर कठोर प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या स्थगन प्रस्तावाला मंजुरी न दिल्यामुळे त्यांनी तीव्र निषेध नोंदवत विरोधी सदस्यांसह सभात्याग केला.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, 2025 च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी 194 प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. तरीही शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, “शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री आणि त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणारे माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतमालाला हमीभाव नाही, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. सरकारने दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच निवडणुकीआधी कर्जमाफी जाहीर केली होती. पण आता समितीकडे विषय सोपवला जात आहे. आम्हाला समिती नको, कृती हवी!”
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी 20 हजार कोटी मंजूर करण्यात आले असताना शेतकरी कर्जमाफीसाठी निधी का नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
लातूरमधील अंबादास पवार या वयोवृद्ध शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपल्याची हृदयद्रावक घटना सांगताना वडेट्टीवार भावुक झाले. ते म्हणाले, “ही वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर का आली? नांगराला बैल जुंपण्याचा खर्चही शेतकऱ्याला परवडत नाही.” यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नावर सर्व कामकाज थांबवून तातडीची चर्चा करण्याची जोरदार मागणी केली.
मात्र, सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे, वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि विरोधी पक्षातील सदस्यांसह सभात्याग केला.